....जमत नसेल तर राजीनामा द्या : सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना 'सल्ला' - Supriya Sule Demands Resignation of Uttar Pradesh CM Yogi Adityanath | Politics Marathi News - Sarkarnama

....जमत नसेल तर राजीनामा द्या : सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना 'सल्ला'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

राहुल व प्रियंका गांधी यांच्याबाबत काल जे काही घडले व त्यावर जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी जी काही वक्तव्ये केली, ती पाहता उत्तर प्रदेश सरकारना काहीतरी दडवायचे आहे असे दिसते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले

पुणे : ''उत्तर प्रदेशात दोन दिवसांत बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या. यावर त्या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री काही बोलत नाहीत. पंतप्रधानांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जर योगी सरकारला महिलांची सुरक्षा सांभाळणे जमत नसेल, त्यांनी राजीनामा द्यावा,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

हाथरसमधील युवतीवर पाच नराधमांनी बलात्कार करून तिचा मारहाण केली होती. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या युवतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिचा मृतदेह गावात आणला पण, पोलिसांनी तिच्या आईवडीलांना आणि नातेवाईकांना विश्वासात न घेता परस्पर अंत्यसंस्कार केले. या पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी व प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह हथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली व नंतर अटक केली. त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना सौ. सुळे यांनी उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत काल घडलेल्या प्रकाराबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. "राहुल व प्रियंका गांधी यांच्याबाबत काल जे काही घडले व त्यावर जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी जी काही वक्तव्ये केली, ती पाहता उत्तर प्रदेश सरकारना काहीतरी दडवायचे आहे असे दिसते,'' असे त्या म्हणाल्या.

संबंधित लेख