Priyanka Gandhi Demands CBI Inquiry in Vikas Dubey Matter | Sarkarnama

विकास दुबे प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी : प्रियंका गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जुलै 2020

विकास दुबे व पोलिस अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचे पत्र तीन महिन्यांपूर्वी मिळाले असूनही त्यावर कारवाई झाली नाही. कुप्रसिद्ध गुन्हेगारांच्या यादीत विकास दुबेचे नांवही नव्हते. हे सगळे संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची 'सीबीआय' मार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे. 

नवी दिल्ली : कानपूरमध्ये आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबे प्रकरणाची 'सीबीआय' चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे. अॅलर्ट असताना विकास दुबे उज्जैनपर्यंत पोहोचला कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यातही काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे विकास दुबे पकडला गेला की शरण आला, अशी विचारणा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे. 

आज सकाळी विकास दुबेला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. त्याला उजैनमधील महाकाल मंदिरात ताब्यात घेण्यात आले आहे. विकास दुबे दोन जुलैपासून फरारी झाला होता. त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी दोन दिवसांमध्ये चकमकीत ठार केले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रियंका गांधी यांनी संशय व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने या विषयात जे गांभीर्य दाखवायला हवे होते, ते त्यांनी दाखवलेले नाही, असे प्रियंका यांनी म्हटले आहे. 

विकास दुबे व पोलिस अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचे पत्र तीन महिन्यांपूर्वी मिळाले असूनही त्यावर कारवाई झाली नाही. कुप्रसिद्ध गुन्हेगारांच्या यादीत विकास दुबेचे नांवही नव्हते. हे सगळे संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची 'सीबीआय' मार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे. 

दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला आहे.

तो पकडला गेला की शरण आला, हे उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट करावे, तसेच त्याच्या मोबाईलचे 'सीडीआर' जाहीर करावेत, जेणेकरुन त्याचे लागेबांधे स्पष्ट होतील, असे यादव यांनी म्हटले आहे. लोकांनी आपल्या 'दिव्य दृष्टी'चा उपयोग गुन्हेगारांना शोधण्साठी करावा, विरोधकांवर खोट्या केसेस करण्यासाठी नाही, असा टोमणा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून लगावला आहे.

Edited By : Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख