लालूप्रसादांची घटस्फोटित सून नितीश कुमारांच्या व्यासपीठावर - Lalu Yadav's Divorcee Daughter in Law Supporting Nitish Kumar | Politics Marathi News - Sarkarnama

लालूप्रसादांची घटस्फोटित सून नितीश कुमारांच्या व्यासपीठावर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

बिहार निवडणुकीत कौटुंबिक बाबींनाही राजकारणाचा आखाडा बनवला जात असल्याचे चित्र आहे. लालू प्रसाद यादव यांच्या घटस्फोटीत सुनेने नितीश कुमारांना समर्थन दिले आहे. ऐश्वर्या रायने याआधी लालूंच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आहे. 

पाटणा : बिहारमधील निवडणूक आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव हे महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. नितीश कुमारांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने शड्डू ठोकला आहे. मात्र, आता या निवडणुकीत कौटुंबिक बाबींनाही राजकारणाचा आखाडा बनवला जात असल्याचे चित्र आहे. लालू प्रसाद यादव यांच्या घटस्फोटीत सुनेने नितीश कुमारांना समर्थन दिले आहे. ऐश्वर्या रायने याआधी लालूंच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आहे. 

ऐश्यर्या राय या तेजप्रताप यादव यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या घटस्फोटाचा विषय आता न्यायलयात प्रलंबित आहे. काल बिहारमध्ये परसा विधानसभा मतदार संघात प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आलेल्या नितीश कुमार यांच्याजवळ मंचावर जाऊन ऐश्वर्या राय यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. तिने आपल्या अगदी लहान भाषणात म्हटलं की, मी तुम्हाला आवाहन करते की माझ्या वडिलांना भरघोस मतांनी विजयी करा. तसेच नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी राहतील यासाठी मतदान करा. यावेळी मी माझ्या वडीलांसाठी मत मागायला आली आहे. ही परसा विधानसभेच्या मान-सन्मानाची बाब आहे. काही काळानंतर मीच आपल्या लोकांमध्ये येणार आहे.  

घटस्फोटाचा विषय प्रलंबित
परसा विधानसभा मतदार संघात चंद्रिका राय जेडीयूचे उमेदवार आहेत. ते याच मतदार संघातून मागच्या वेळी राजदच्या तिकीटावर निवडणूक जिंकले होते. मात्र, आता या घटस्फोटाने बिघडलेल्या नातेसंबंधामुळे त्यांनी पक्ष सोडून जेडीयूमध्ये  प्रवेश केला आहे. यादरम्यानच त्यांची मुलगी ऐश्वर्या रायचा लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलासोबत म्हणजे तेजप्रताप यादवसोबत विवाह झाला. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. सध्या त्यांच्या घटस्फोटाचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे.

नितीश कुमारांनी प्राप्त परिस्थितीत याचा राजकीय फायदा घेण्याची संधी सोडली नाही. त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या सुनेची बाजू लोकांसमोर मांडली. नितीश कुमारांनी तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाचा उल्लेख करत म्हटलं की, एका सुशिक्षित मुलीसोबत असा दुर्व्यवहार केला गेला. प्रकृतीने अशा कृत्यासाठी काही ना काही तरी व्यवस्था केलीच असेल. 

महिलांचा अपमान करणे अयोग्य
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लग्नाचा उल्लेख करत म्हटलं की, त्यांच्या लग्नात आम्ही गेलो होतो. मात्र, त्यानंतर जे झालं ते कुणालाच आवडलेलं नाहीये. यासोबतच त्यांनी म्हटलं की, महिलांचा अपमान आणि त्यांच्यासोबत असा व्यवहार करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांना आता हे समजत नसेल, मात्र, भविष्यात महिलेच्या विरोधात केल्या गेल्या या कृत्याची शिक्षा जरुर मिळेल. कारण, महिलांचा अपमान करणे खुपच भयावह आहे. 

ऐश्वर्याच्या भाषणानंतर सभेत थोडा गोंधळ झाला. सभेच्या गर्दीतून लालू प्रसाद यादवांच्या समर्थनार्थ काही घोषणा ऐकायला मिळाल्या. यावर नितिश कुमारांनी आक्रपणे म्हटलं की, तुम्ही ज्यांच्या आज्ञेखातर इथे आला आहाता त्यांना या घोषणांनी काही फायदा होणार नाही. जे काही घडलं ते लज्जास्पद होतं. एका कुंटुंबाद्वारे महिलेचा केलेला अपमान होता. तिच्यामागे दरोगा प्रसाद राय यांच्या वारसा आहे. तसेच नितीश कुमारांनी चंद्रिका राय यांचं कौतुक करत म्हटलं की आम्ही दोघांनीही 1985 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून एकत्रच विधानसभेत  प्रवेश केला होता.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख