गुजरातच्या मंत्रीपुत्राला खडेबोल सुनावणाऱ्या महिला पोलिसाचा राजीनामा नामंजूर - Gujrat Lady Constable's Resignation Not Accepted | Politics Marathi News - Sarkarnama

गुजरातच्या मंत्रीपुत्राला खडेबोल सुनावणाऱ्या महिला पोलिसाचा राजीनामा नामंजूर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 जुलै 2020

सुरतमध्ये वराछा येथे गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री कानाणी यांच्या मुलांशी महिला पोलिस काँस्टेबल सुनीता यादव हिचा वाद झाला होता. त्यानंतर तिने राजीनामा दिला होता. तो नामंजूर करून तिची बदली करण्यात आली. त्यानंतर आज सुनिता यादवने पुन्हा एकदा सोशल मिडियावर अपिल करत नव्या हॅशटॅगसह पाठिंब्याचे आवाहन केले आहे.

सुरत : सुरतमध्ये वराछा येथे गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री कानाणी यांच्या मुलांशी महिला पोलिस काँस्टेबल सुनीता यादव हिचा वाद झाला होता. त्यानंतर तिने राजीनामा दिला होता. तो नामंजूर करून तिची बदली करण्यात आली. त्यानंतर आज सुनिता यादवने पुन्हा एकदा सोशल मिडियावर अपिल करत नव्या हॅशटॅगसह पाठिंब्याचे आवाहन केले आहे.

सुरतच्या संबंधित भागात कारोनामुळे कर्फ्यू आहे. त्यामुळे नियमाचे पालन करणे हे मंत्रीपुत्रालाही आवश्‍यक आहे. पण, नियम तोडणाऱ्या मंत्री पुत्राला यादव हिने दोन खडे बोल सुनावले. कारवाईचा इशारा दिला. या वादानंतर मंत्री पुत्राने वरिष्ठांकडे तक्रार केली. ही घटना गेल्या शुक्रवारी रात्री घडली होती. या घटनेचा ऑडिओ व्हायरल झाल्याने घटनेचे वास्तव जगापुढे आले. 

सुनीता या घटनेनंतर जेव्हा पोलीस स्टेशनला आली तेव्हा तिची बदली करण्यात आल्याचे तिला सांगण्यात आले. हा तिच्यासाठी खरे तर धक्का होता. पोलीसच पोलीसाची बाजू घेत नाहीत. सत्य जाणून घेत नाहीत याचे दु:ख तिला झाले. संताप, चीड आली. तिने तातडीने नोकरीचा राजीनामाही दिला होता. तो नामंजूर करण्यात आला आहे. याबाबत सुनिता यादवने आज एक ट्वीट केले आहे. 'माझा राजीनामा काल नामंजूर करण्यात आला. माझी बदली करण्यात आली. माझ्या ईमानदारीचे हे बक्षिस आहे. मी आज पुन्हा #Stop_Transfer_Sunita_Yadav या नव्या हॅशटॅगने आपला पाठिंबा मागते आहे,' असे ट्वीट तिने केले आहे

या घडामोडीनंतर सुनीताने ट्‌विट केले होते."मी सरकारची नोकरी करते कोणाच्या बापाची नाही. काही भ्रष्ट लोक नेता आणि मंत्र्यांचे गुलाम बनले आहेत. मी माझा स्वाभिमान कधीच गहान टाकणार नाही. अंगावरील वर्दीसाठी मी भारत मातेची शपथ घेतली आहे. अरे मी माफी का मागायची आणि कशासाठी ? कदापी माफी मागणार नाही. नोकरीचा राजीनामा द्याला लागला तरी चालेल.'' असे तिने या ट्वीटमध्ये म्हटले होते.

पोलीस खात्यातील काही भ्रष्ट मंडळींना स्वाभिमान नाही. वर्दीपेक्षा त्यांना पैसा प्रिय आहे.त्यामुळे भ्रष्ट नेते हे चांगल्या आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांना त्रास देतात. एका तराजूत मोजतात. मात्र मी तरी कोणासमोर झुकणार नाही असेही सुनीता यादव यांनी म्हटले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख