अयोध्येतल्या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकतेचा संदेश जावा : प्रियंका गांधींची अपेक्षा - Congress Leader Priyanka Gandhi Issues Statement about Ram Mandir bhoomipoojan | Politics Marathi News - Sarkarnama

अयोध्येतल्या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकतेचा संदेश जावा : प्रियंका गांधींची अपेक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

भगवान रामाचे चरित्र युगा-युगांपासून भारतात मानवतेला जोडणारे सूत्र राहिले आहे. राम सर्वांचा आहे. तो शबरीचा आहे, सुग्रीवाचाही आहे. राम वाल्मिकींचा आहे आणि भासांचाही. राम कबीराचे आहेत, तुलसीदासांचे आहेत. गांधीजींचे रघुपती राघव राजा राम सर्वांना सद्बुद्धी देणारे आहेत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली : अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमीपुजन उद्या होत आहे. या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकता, बंधुत्व व संस्कृती यांचा संदेश जगासमोर जावा, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी - वाड्रा यांनी एका पत्रकाव्दारे व्यक्त केली आहे. 

''जगावर आणि भारतीय उपखंडावर रामायणाची खोलवर छाप आहे. भगवान राम, माता सीता आणि रामायण हजारो वर्षांच्या धार्मिक आणि सांस्कृतीक जीवनाचा हिस्सा आहेत. रामायणातल्या प्रसंगांवरुन भारतीय धर्म, निती, कर्तव्याचे पालन, त्याग, प्रेम, पराक्रम आणि सेवा या गुणांची प्रेरणा घेतात. भारतात चारी दिशांना आपापल्या परीने रामकथा सांगितल्या जातात. रामकथा ही अमर आहे,'' असे प्रियंका यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

त्या पुढे म्हणतात, ''भगवान रामाचे चरित्र युगा-युगांपासून भारतात मानवतेला जोडणारे सूत्र राहिले आहे. राम सर्वांचा आहे. तो शबरीचा आहे, सुग्रीवाचाही आहे. राम वाल्मिकींचा आहे आणि भासांचाही. राम कबीराचे आहेत, तुलसीदासांचे आहेत. गांधीजींचे रघुपती राघव राजा राम सर्वांना सद्बुद्धी देणारे आहेत."

''दुर्बलांना बळ देणारा असे राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांनी रामाचे वर्णन केले आहे. राम म्हणजे साहस, राम म्हणजे संगम. श्रीराम सर्वांचे आहेत. भगवान राम सर्वांचे कल्याण पाहतात. म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत,'' असेही प्रियंका यांनी म्हटले आहे. 

येत्या पाच आॅगस्ट रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराच्या भूमिपुजनाचा कार्याक्रम होत आहे. श्रीरामाच्या कृपेने या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकता, बंधुत्व व संस्कृतीचा संदेश प्रसारित व्हावा, असेही प्रियंका यांनी शेवटी म्हटले आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला अवघे २४ तास उरले असताना मी राममंदिर भूमिपुजनाबाबत कुठलेही वक्तव्य करणार नाही, मात्र राजकारण हा धर्म असावा, धर्माचे राजकारण होऊ नये, हाच रामचरित्राचा संदेश आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख