योगींना त्यांच्या मठात पाठवा : मायावती कडाडल्या - BSP Chief Mayawati Lashesh out at Yogi Adityanath | Politics Marathi News - Sarkarnama

योगींना त्यांच्या मठात पाठवा : मायावती कडाडल्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

उत्तर प्रदेशच्या लोकांच्या हितासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी  मायावती यांनी केली. उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचार झाले नाहीत, असा एकही दिवस गेलेला नाही. योगी आदित्यनाथ यांना महिलांना संरक्षण देणे जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे मायावती म्हणाल्या

लखनौ : ''उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महिलांची सुरक्षा जपणे जमत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा व माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केली आहे. केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या गोरखनाथ मठात पाठवावे; त्यांना ते नको असेल तर त्यांना राम मंदिराच्या उभारणीची जबाबदारी द्यावी, असाही टोला त्यांनी लगावला. 

उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे, असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर या तरुणीने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर या युवतीच्या घरच्यांच्या अनुपस्थितीत तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कारही केले. यावरुन उत्तर प्रदेशच्या सरकारवर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरी सर्व स्तरांतून टीका होत आहे. 

या घटनेवरुन मायावती यांनीही भाजपला व योगी सरकारला लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशच्या लोकांच्या हितासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही मायावती यांनी केली. उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचार झाले नाहीत, असा एकही दिवस गेलेला नाही. योगी आदित्यनाथ यांना महिलांना संरक्षण देणे जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे मायावती म्हणाल्या. 

''हाथरसच्या घटनेनंतर महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात उत्तर प्रदेश सरकार कडक कारवाई करेल अशी माझी अपेक्षा होती. पण नंतर लगेचच बलरामपूर येथेही एका दलित विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडली. भाजपच्या सरकारच्या काळात गुन्हेगार, माफिया व बलात्कारी यांना मोकळे रान मिळाले आहे,'' असेही मायावती म्हणाल्या.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख