लाड यांच्या रूपाने जयंत पाटील सांगलीला आणखी एक आमदार देणार का?  - Will Jayant Patil give another MLA to Sangli in the form of Arun Lad? | Politics Marathi News - Sarkarnama

लाड यांच्या रूपाने जयंत पाटील सांगलीला आणखी एक आमदार देणार का? 

जयसिंग कुंभार 
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या नावाची दबक्‍या आवाजात चर्चा होती.

सांगली : पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत जोरदार चुरस आहे. गेल्या निवडणुकीतील विजेते आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विजयाने हुलकावणी दिलेले सारंग पाटील हे दोघेही आगामी निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहेत. 

दरम्यान, गेल्या निवडणुकीत बंडखोरी करणारे आणि नंतर राष्ट्रवादीशी कायम नाते ठेवणारे सांगलीचे अरुण लाड पुन्हा एकदा या मतदारसंघातून इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लाड यांच्यासाठी ताकद वापरणार का? याची चर्चा सध्या सांगलीत सुरू आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे प्राबल्य असतानाही भाजपचे चंद्रकांतदादा पाटील यांनी येथून निवडणूक जिंकून दाखवली होती. गतवेळचा पराभव तर अगदी काठावरचा होता. बंडखोरी झाली नसती तर कदाचित सारंग पाटील येथून आमदार झाले असते, असे आजही बोलले जाते. 

गतवेळच्या पराभवाचा वचपा काढायचा, यासाठी वेळी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादीचा या वेळचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असणार आहे. म्हणजे कॉंग्रेस आणि शिवसेनेची मदत राष्ट्रवादीसाठी बेरजेची ठरणार आहे. 

राष्ट्रवादीकडून गतवेळी लढलेले सारंग पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच आपण निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पाटील यांच्यापाठोपाठ मते घेतणारे राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड यांच्यासाठी उमेदवारी मिळविण्याचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीकडून नीता ढमाले, उमेश पाटील, बाळराजे पाटील, श्रीमंत कोकाटे, प्रताप माने, मनोज गायकवाड, भरत रसाळे अशी अन्य नावेही चर्चेत आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या नावाची दबक्‍या आवाजात चर्चा होती. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या उमेदवारीसाठीही सांगलीतून पत्रकबाजी झाली होती. मात्र, या साऱ्या चर्चांना बहर येण्याआधीच त्या संपल्या. 

अरुण लाड यांचे गेल्या काही वर्षांपासून ही निवडणूक लढायचीच या इराद्याने प्रयत्न सुरू आहेत. गतवेळी त्यांनी बंडखोरी केली होती; मात्र, राज्यातून कॉंग्रेस आघाडीची सत्ता गेल्यानंतरही लाड यांनी पुन्हा राष्ट्रवादीशी आपली निष्ठा कायम राखली होती. याशिवाय लाड यांनी त्यांचे पलूस-कडेगाव मतदारसंघातील पारंपरिक विरोधक, राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्यासोबतही विधानसभा निवडणुकीपासून जुळवून घेतले आहे. गेली दोन वर्षे त्यांच्याकडून मतदार नोंदणी सुरू आहे. 

दरम्यान, आर. आर. पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आता जिल्ह्यात जयंतरावांकडे आहे. त्यामुळे त्यांनी स्वजिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी जातीने लक्ष घातले आहे. लाड यांच्या रुपाने ते जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळवून देण्यासाठी पक्षात आपले वजन वापरतात का, हे लवकरच स्पष्ट होईल. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख