'एखादा तरुण नेतृत्व करीत असेल तर अडचण काय?'  : फडणवीसांची बाजू घेत दरेकरांची खडसेंवर टीका 

एकनाथ खडसे यांच्या उतारवयातील राजकारणाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही.
"What's the problem if a young person is leading?" : Darekar criticizes Khadse
"What's the problem if a young person is leading?" : Darekar criticizes Khadse

सांगली : "पक्षात एखादा तरुण (विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस) मोठा होत असेल, नेतृत्व करीत असेल तर अडचण काय? नेतृत्व कुणीतरी एकटाच करू शकतो, सर्वांना थोडीच प्रमुख करणे शक्‍य आहे,'' असे म्हणत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांची बाजू घेत एकनाथ खडसे यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयावर टीका केली. 

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खडसे हे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. 

अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची सांगलीत पाहणी करण्यासाठी आलेल्या दरेकर यांनी नाथाभाऊंच्या पक्षांतराच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की एकनाथ खडसे यांच्या उतारवयातील राजकारणाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांनी महत्त्वाकांक्षेसाठी हा निर्णय घेतला असेल तर हरकत नाही. परंतु, ज्या पक्षाने तुम्हाला मोठे केले, त्यावर टीका करणे योग्य नाही. तुम्ही पक्षाला मोठे केले, हे मान्यच आहे. पण, सोबत तुम्हालाही पक्षाने मोठे केलेले असते. 

"पक्षात एखादा तरुण (फडणवीस) मोठा होत असेल, नेतृत्व करीत असेल, तर अडचण काय? नेतृत्व कुणीतरी एकटाच करू शकतो, सर्वांना थोडीच प्रमुख करणे शक्‍य आहे,'' असे म्हणत दरेकर यांनी फडणवीसांची बाजू घेत खडसेंवर मात्र शाब्दीक हल्ला केला. 


खडसे यांच्या पक्षातून जाण्याने धक्का बसला : पंकजा मुंडे 

"ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब पक्षातच राहावेत, अशी पोस्ट मी काल केली होती. मी आज दिवसभर प्रवासात आहे, त्यामुळे खडसे यांच्या निर्णयाबद्दल मला काही माहीत नाही. मात्र, त्यांच्या पक्ष सोडून जाण्याने मला धक्का बसला आहे,' अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. 

आमच्यासाठी धक्कादायक, दुःखदायक, चिंतन करायला लावणारी घटना : मुनगंटीवार 

"नाथाभाऊ यांच्या राजीनाम्याची बातमी आमच्यासाठी नक्कीच धक्कादायक आहे. ज्यांनी 40 वर्षे भारतीय जनता पक्षाची सेवा केली, पक्ष वाढवला, ते खडसे आज कोणत्यातरी नाराजीतून पक्ष सोडून जात आहेत. ते आमच्यासाठी धक्कादायक, दुःखदायक आणि निश्‍चित चिंतन करण्यासारखे आहे,' अशी स्पष्ट कबुली माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com