शिमग्याला आपण जे करतो, ते मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याच्या भाषणात केले : चंद्रकांत पाटील  - What we do to Shimga, the Chief Minister did in his Dussehra speech : Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

शिमग्याला आपण जे करतो, ते मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याच्या भाषणात केले : चंद्रकांत पाटील 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

विरोधकांना शिव्या, शाप देणारे ते भाषण होते.

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात महाराष्ट्रातील एकही प्रश्‍न नव्हता. केवळ विरोधकांना शिव्या, शाप देणारे ते भाषण होते. राज्यपालासारख्या घटनाधिष्टीत पदाचाही सन्मान ठाकरे यांनी भाषणात ठेवला नाही. विरोधकांना शिव्या देणारेच त्यांचे भाषण हे दसऱ्याचे नव्हते, तर शिमग्याचे भाषण होते, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. 

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, "शिमग्याला आपण जे करतो, ते मुख्यंत्र्यांनी दसऱ्याच्या भाषणात केले. त्यांचे भाषण म्हणजे केवळ विरोधकांना शिव्या शाप होते. शेण, गोमूत्र असेच शब्द त्यांच्या भाषणात होते. शेतकरी कर्जमाफी, चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, मराठा आरक्षण, शैक्षणिक वर्षाची सुरुवात यातील एकाही प्रश्‍नावर ते बोलले नाहीत. त्यांच्याजवळ अकरा महिन्यांच्या कारकिर्दीत सांगण्यासारखे काहीही नाही.' 

"राज्यपालांचाही सन्मान त्यांना ठेवता आला नाही. त्यांच्या भाषणाने मुख्यमंत्री पदाची गनिमा खालावली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे ते भाषण दसऱ्याचे नव्हते तर शिमग्याचे होते. आमच्यावर टीका केल्यावर जशाच तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. त्यामुळेच आम्ही त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले,' असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

जनता निवडणुकीत दाखवून देईल खरे हिंदुत्त्ववादी कोण ते? 
भाजपेने हिंदुत्व म्हणजे काय हे संघाकडून शिकावे या प्रश्‍नावर पाटील म्हणाले, "खरे हिंदुत्ववादी कोण आहे, हे राज्यातील जनतेला माहिती आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे. लोकांना केवळ निवडणुकीतच आपले मत व्यक्त करता येते. त्यामुळे निवडणुकीमध्ये खरे हिंदुत्त्ववादी कोण हे मतदार शिवसेनेला दाखवून देतील.' 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख