पुत्रप्रेमापोटी रामदास कदमांनी केलेली भूमिपूजने हक्कभंग नव्हती का? : राष्ट्रवादीकडून शिवसेना आमदारांवर पलटवार  - Wasn't the land worship done by Ramdas Kadam a violation of rights? : NCP retaliates against Shiv Sena MLAs | Politics Marathi News - Sarkarnama

पुत्रप्रेमापोटी रामदास कदमांनी केलेली भूमिपूजने हक्कभंग नव्हती का? : राष्ट्रवादीकडून शिवसेना आमदारांवर पलटवार 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

आमदार योगेश कदम यांनी तटकरे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून मोठी चूक केली आहे.

दाभोळ : महाविकास आघाडीतील संदोपसुंदी लपून राहिलेली नाही. या आघाडीतील प्रबळ पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोकणातील नेत्यांमध्ये वाद पेटला आहे.

कोकणातील शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी मतदारसंघातील विकासकामांच्या कार्यक्रमात डावलेले जात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

त्याला दापोलीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदमांनी प्रत्युत्तर देत आमदार कदमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

पुत्रप्रेमापोटी स्थानिक आमदारांना डावलून तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली मतदारसंघात योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सपाटा लावला होता. तो हक्कभंग नव्हता का, असा खडा सवाल माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे.

आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात दाखल केलेला हक्कभंगाचा प्रस्ताव म्हणजे स्टंटबाजी आहे, अशी टीकाही संजय कदमांनी केली आहे. 

दापोली मतदारसंघात ग्रामपंचायत सदस्यही नसताना आमदार कदम भूमिपूजन करत होते. वडील मंत्री असल्याने अनेक शासकीय भूमिपूजन फलकावर त्यांचे नाव टाकण्यात आले होते. हा हक्कभंग होत नाही का, असा थेट सवाल माजी आमदार संजय कदम यांनी करून योगश कदमांवर जोरदार हल्लाबोल केला. 

आमदार कदम यांनी तटकरे यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे 20 ऑक्‍टोबरला हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्याबाबत संजय कदम यांनी भूमिका स्पष्ट केली. 

आमदार योगेश कदम यांनी तटकरे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून मोठी चूक केली आहे. यापूर्वी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री दापोली मतदारसंघांमध्ये नाक खुपसत होते, तेव्हा हक्कभंग होत नव्हता का? जनतेची दिशाभूल करणे योगेश कदम यांनी थांबवावे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गुण्यागोविंदाने नांदत आहे. परंतु स्थानिक पातळीवर जुळवून घेण्याऐवजी कुरघोडी करण्याचे काम सुरू आहे. 

आमदार योगेश कदम यांनी केवळ एकच पावसाळा बघितला आहे. आताच ते हक्कभंगाची भाषा करू लागले आहेत. खासदार तटकरे यांनी आपल्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली, तर बिघडले कुठे? त्यांनी मतदारसंघात विकासकामे करायची नाहीत का? आंबेत म्हाप्रळ पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव आपल्या कारकिर्दीत पाठविण्यात आला होता. याचा पाठपुरावाही केला होता. गेली पाच वर्षे विरोधी पक्षाचा आमदार या नात्याने स्थानिक आमदारांना डावलले जात होते, तेव्हा प्रोटोकॉल कुठे होता, असा सवालही संजय कदम यांनी केला आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख