राष्ट्रवादीला ललकारणारे विश्वजित कदम कॉंग्रेसमध्ये ऐक्य घडवतील?  - Vishwajit kadams challenging the NCP will unite the Congress! | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीला ललकारणारे विश्वजित कदम कॉंग्रेसमध्ये ऐक्य घडवतील? 

जयसिंग कुंभार 
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

प्रकाशबापू-विष्णूअण्णा आणि कदम-दादा गट या वादातून अजूनही इथले कॉंग्रेसजन बाहेर पडलेले नाहीत.

सांगली  ः ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने 2017 मध्ये इंधन दरवाढीविरोधात रास्ता रोको आंदोलन केले होतं. त्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील कॉंग्रेसजन थेट इतक्‍या मोठ्या संख्येने कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर आले. पक्षाच्या देशव्यापी आंदोलनाची हाक होती. मात्र, यानिमित्ताने जिल्हा कॉंग्रेसमध्ये बऱ्याच दिवसांनंतर धुगधुगी दिसली. शिराळा ते जत अशा जिल्हाभरातील कॉंग्रेस नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी एकमेकांचे प्रत्यक्ष चेहरे पाहिले. सध्या राज्य मंत्रिमंडळात पक्षाचा चेहरा असलेल्या राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी सांगली कॉंग्रेसचाच बालेकिल्ला असा निर्धार व्यक्त करत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला इशारा दिला आहे; पण आता एकत्रित कृती हवी! 

आजघडीला कॉंग्रेस सत्ताधारी किंवा विरोधक अशा प्रमुख भूमिकेत मिरज, पलूस-कडेगाव आणि जत या तीनच विधानसभा मतदारसंघात दिसते. उर्वरित ठिकाणी पक्षाचे अस्तित्व शोधायची वेळ आली आहे. भाजपने मात्र सर्व तालुक्‍यांत यापैकी एका भूमिकेत स्थान मिळवले आहे. ते त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा कॉंग्रेसला अधिक पोखरून मिळवलेय. फडणवीस सरकारच्या पूर्ण काळात कॉंग्रेस विरोधकाच्या मोडमध्ये कधी गेलीच नाही. आणि आता पुन्हा एकदा सत्तेतील तिसरा का असेना वाटा मिळाल्याने पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये सत्तेची ऊब आली आहे. त्यांना विरोधक म्हणून आपली भूमिका पाच वर्षांत समजली नाही आणि आताही नाही.
 
पतंगराव, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील, नानासाहेब महाडिक असे जिल्ह्यातील चार मातब्बर नेते आता हयात नाहीत. अगदी अलीकडे अजितराव घोरपडे, सदाशिवराव पाटील, सत्यजित देशमुख, राहुल महाडिक यांनी पक्षाला रामराम ठोकत आपापल्या भागातून कॉंग्रेसला रिकामी केली. तिथे नव्याने पक्ष उभारणी-मेळावे तर दूरच, त्यांच्या पश्‍चात तालुका पदाधिकाऱ्यांची नव्याने नावे जाहीर केलेली नाहीत. 

जिल्ह्याचे केंद्र सांगलीत तर भाजपने मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या काखेत बसत महापालिकाही ताब्यात घेतली. कॉंग्रेसमधील कुमकच तिकडे गेली, हे वास्तव असले तरी इथे प्रकाशबापू-विष्णूअण्णा आणि कदम-दादा गट या वादातून अजूनही इथले कॉंग्रेसजन बाहेर पडलेले नाहीत. ही झाली पार्श्‍वभूमी. 

जिल्ह्यात राष्ट्रवादी आपला परीघ वाढवत आहे. मात्र, विश्‍वजित कदम यांनी ‘कोणी काही करत असले तरी कॉंग्रेसचा बालेकिल्ला अढळ राहील’ असे सुनावले. त्यानंतर मोर्चा काढून पक्षात जान फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये धुगधुगी जाणवत आहे. 

 आजघडीला विश्‍वजित कदम, विक्रमसिंह सावंत असे दोन तरुण आमदार पक्षाकडे आहेत. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासारखे नेते सक्रिय दिसत आहेत. मात्र त्यांच्यावर घराणेशाहीचा आक्षेप घेतला जातो. राजकीय परिघाबाहेरच्या नेतृत्वाला कॉंग्रेसमध्ये संधी मिळेल, असे वातावरण आजही का होत नाही? हे भाजप-राष्ट्रवादीतही काही प्रमाणात असले तरी तुलनेने तिथे नव्या चेहऱ्यांना संघटनात्मक आणि संस्थात्मक पातळीवर संधी मिळाल्याचे दिसून येते. 

विविध समाजघटकांना सामावून घेणारा कृती कार्यक्रम पक्षाला जिल्हास्तरावर राबवावा लागेल. तालुका स्तरावर पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व दाखवणे हेच आता आव्हान आहे. त्यांचे पालकत्व कोण घेणार? आता कॉंग्रेसकडे पूर्वीसारखी निर्विवाद सत्ता नाही. सहकारी संस्थाचे बळ नाही. सत्तेचा हा गोंद नसेल तर कॉंग्रेसची अवस्था काय होते, हे गेल्या पाच-सहा वर्षांत दिसले आहे. तळागाळात आता कॉंग्रेसची घट्ट वीण उसवली आहे. 

याच पार्श्‍वभूमीवर महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र या, असे आवाहन केले आहे. कदम व दादा गट हे मनावर घेणार काय? कॉंग्रेसी परंपरेत वाढलेले कारभारी आता पांगले आहेत. त्यांची मोट बांधायची तर पुन्हा एकदा जिल्हाभरात जुळणी करणारा नेता हवा. जिल्ह्यात पक्षाला गतवैभव मिळवणे अवघडच. तशी अपेक्षाही गैर मात्र किमान वसंतदादांचा...कॉंग्रेसचा बालेकिल्ला असं म्हणायचं तर इतिहासाला साजेशी कामगिरी हवी. 

ओस पडलेली पक्ष कार्यालये, कॉंग्रेस कमिटी पुन्हा कार्यकर्त्यांनी गजबजेल. तेथे कधीही नेते भेटतील, सहकारी संस्थांना नव्याने बाळसे येईल, तालुक्‍या-तालुक्‍यांमध्ये परिघाबाहेरचे पदाधिकारी नेमून कृतिशील होतील अशा साऱ्या अपेक्षा पूर्ण होणं, हा कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग असेल. मात्र, अशा कार्यकर्त्यांना वेचणारे नेतृत्व हवे. पालक हवा. जिल्ह्यातील कॉंग्रेसला अशा पालकाची कधी नव्हे इतकी आज गरज आहे. दुसऱ्याची रेघ छोटी करण्याऐवजी आपली रेघ मोठी करण्याची मानसिकता तरी हवी.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख