'विद्वान' म्हणत उदय सामंतांची नारायण राणेंवर टीका  - Uday Samant criticizes Narayan Rane | Politics Marathi News - Sarkarnama

'विद्वान' म्हणत उदय सामंतांची नारायण राणेंवर टीका 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सिंधुदुर्गातील दादागिरी संपली.

कोल्हापूर : "पूर्वी सिंधुदुर्गात काही जणांची दादागिरी होती. आता तेथे शिवसेना मजबूत झाली आहे. त्यामुळे कोणाचीही दादागिरी तेथे चालत नाही. ते "विद्वान' आमच्यावर जेवढी टीका करतील, तेवढी आमची मते वाढतात. त्यामुळे त्यांनी टीका करावी, आमचा फायदा होईल,' अशा शब्दांत भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर नाव न घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी टीका केली. 

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी कोल्हापूरचे संपर्कमंत्री झाल्यानंतर उदय सामंत आज प्रथमच येथे आले होते. कानडी अत्याचाराच्या निषेधार्थ काळी फित लावून त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद झाली. त्यात सामंत बोलत होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात नाव न घेता राणे पिता पुत्रांवर उपरोधिक टीका केली होती. त्याला नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत एकेरी भाषेत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जहाल भाषेत टीका केली होती. त्यावरून शिवसेना नेते आणि राणे यांच्यात कलगीतुरा रंगला होता. तोच मुद्दा पकडून आज सामंत यांनी राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली. 

कर्नाटक सीमा प्रश्‍नावरून ठोस भूमिका न घेणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सामंत यांनी या वेळी टीका केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सवदी हे चंद्र, सूर्य असेपर्यंत बेळगाव आमचेच राहणार म्हणतात, पण त्यावर पाटील काही बोलत नाहीत. कर्नाटक प्रश्‍नावर भाजपची कोणतीच भूमिका नाही, असा टोला त्यांनी लगावला. 

दीपक केसरकर यांच्याकडून शेलक्‍या शब्दांत राणेंवर टिकास्त्र 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर काहींनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र, आशा लोकांकडे दुर्लक्षच केलेले बरे. ज्यांची मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफ म्हणून काम करण्याचीही योग्यता नव्हती. त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले होते. मात्र त्यांना याची जाण नाही, असा टोला माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी खासदार नारायण राणे यांना नाव न घेता लगावला होता. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील काही अपप्रवृत्तीच्या घटना माझ्या कानावर आलेल्या आहेत, त्या विरोधात माझा लढा असेल, असेही केसरकर यांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख