शिवसेनेला झुकते माप ; कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून दुजाभाव नाही 

शेट्टी यांनी जीआर निघण्याची वाट पाहावी, नंतर मोर्चाचा निर्णय घ्यावा
शिवसेनेला झुकते माप ; कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून दुजाभाव नाही 
1101Sarkarnama_20Banner_20_287_29_12_0.jpg

कोल्हापूर : शिवसेनेची शासकीय विश्रामगृहावर बैठक नुकतीच झाली. तेथे जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांविरोधात कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. यावेळी जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेशी दुजाभाव केला जात नाही, तर त्यांना झुकते माप देत असल्याची स्पष्टोक्ती पालकमंत्री सतेज पाटील Satesh Patil यांनी काल येथे केली. माजी खासदार राजू शेट्टी Raju Shetty पूरग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी मोर्चा काढणार असल्याच्या प्रश्‍नावर, शेतीच्या नुकसानीचा जीआर अद्याप निघालेला नाही. पंचनामे पूर्ण होताच तो निघेल. जीआर निघण्याची वाट शेट्टी यांनी पाहावी, नंतर मोर्चाचा निर्णय घ्यावा, असेही पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  


शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रोश मोर्चा काढणार आहेत, यावर पालकमंत्री पाटील म्‍हणाले, ‘‘सध्या घरांचे, दुकानांचे पंचनामे झाले आहेत, त्यांना मदत देण्याचे काम सुरू आहे. शेतीचे पंचनामे झालेले नाहीत. तेही मंगळवारपर्यंत पूर्ण करावेत, असे सांगितले आहे. पुनर्वसनासाठी येत्या शुक्रवारपासून बैठका होणार आहेत. शेतीच्या मदतीचा जीआर (परिपत्रक) अद्याप निघालेले नाही. ते निघाल्यानंतर मदतीची माहिती घ्यावी, ती त्यांना मान्य नसेल तर त्यांनी जरूर मोर्चा काढावा, येथे सर्वांना अधिकार आहे. मात्र नुकताच कोविडमधून आपण बाहेर पडत आहे. पॉझिटिव्हीटीचा दर कमी होत आहे, अशा वेळी मोर्चा काढणे उचित ठरणार नाही, असे वाटते.’’ शेतीतील काय कळत नाही, असे हे सरकार असल्याची टीका होत असल्याच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘‘शेतीच्या नुकसानीचा जीआर अद्याप निघालेला नाही. तो निघाल्यावर कळेल की शेतीतील कोणाला जादा कळते. येथे सर्वजण शेतीतील जाणकार आहेत. हे दिसून येईल.’’

शिवसेनेशी काँग्रेस-राष्ट्रवादीशी दुजाभाव केला जात असल्याचा आरोप झाल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘‘राजेश क्षीरसागर आणि आमदार आबीटकर यांनाही पदे दिली आहेत. वेगवेगळ्या नियुक्त्यांसंदर्भात संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी वारंवार बोलवणे होते, माझ्याकडे एकही तक्रार आलेली नाही, महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याप्रमाणेच नियुक्त्या केल्या जात आहेत. कोल्हापूरची बाजार समिती, वडगाव बाजार समिती, संजय गांधी निराधर योजना अशा सर्वच याठिकाणी झालेल्या नियुक्त्या ह्या आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार आहेत. त्यामध्ये दुजाभाव नाही. उलट शहरात आमदार चंद्रकांत जाधव असतानाही राजेश क्षीरसागर यांना १५ कोटींचा निधी दिला आहे. दुजाभाव कसा केला याबाबत संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशीही बोलणार आहे. प्रत्यक्षात शिवसेनेशी दुजाभाव केला जात नाही, तर त्यांना झुकते माप दिले जाते.’’

महा ई सेवा केंद्रावर ठिकठिकाणी दाखल्यांसाठी वेगवगेळा दर आकारला जात आहे. यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘माझ्याकडे राज्यभरातून याबाबतच्या तक्रारी येत आहेत. सर्वांसाठी एकच दर ठरविता येणे शक्य आहे काय याचीही माहिती घेतली जाईल. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे.
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.