ब्राह्मणांना भाजप, सेना गृहित धरतात.. काॅंग्रेस, राष्ट्रवादी दुर्लक्ष करतात : कोल्हापुरात होणार विचारमंथन - state level Brahman round table conference to be held in Kolhapur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्राह्मणांना भाजप, सेना गृहित धरतात.. काॅंग्रेस, राष्ट्रवादी दुर्लक्ष करतात : कोल्हापुरात होणार विचारमंथन

सुनील पाटील
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याची तक्रार.... 

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद आयोजीत आणि ब्रह्म महाशिखर परिषद (राज्यस्तरीय समिती) यांची ब्राह्मण समाजाची गोलमेज परिषद रविवारी (ता. 8) होत आहे. हॉटेल पॅव्हेलियनमध्ये परिषद होत असून महाराष्ट्रातील ब्रह्मवृंद उपस्थित राहतील, अशी माहिती अध्यक्ष मकरंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात गोलमेज परिषद भरवली असून 22 जानेवारी 2019 ला आझाद मैदान (मुंबई) येथे आंदोलन झाले होते. भाजप सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. 22 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. नंतर 22/23 फेब्रुवारीला कोल्हापुरात सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ब्राह्मण अधिवेशन पार पडले. सर्व नेत्यांनी ब्राह्मण समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. 

श्री. कुलकर्णी म्हणाले, "भाजप, शिवसेना ब्राह्मण समाजाला गृहीत धरतो; तर राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष हे आम्ही मतदार आहोत, असे समजून दुर्लक्ष करतात. ब्राह्मण समाजाची "व्होट बॅंक' कमी आहे असे गृहीत धरले जाते; पण प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 43 मतदार संघात ब्राह्मण समाज परिणामकारक भूमिका बजावू शकतो. ब्राह्मण समजाचे प्रलंबित प्रश्नाबाबत जो आम्हाला न्याय देईल त्याला आमचे सहकार्य राहील; पण इथून पूढे कोणत्याही पक्षाने ब्राह्मण समाजाला गृहीत अथवा ब्राह्मण समाजाला डावलण्याची भूमिका घेऊ नये. ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे.''  पत्रकार परिषदेला सुरज कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, निलेश कुलकर्णी, प्रदीप अष्टेकर, दिलीप धर्माधिकारी, कमलाकर देशपांडे आदी उपस्थित होते. 

 

ही पण बातमी वाचा : राज्यपाल कोट्यासाठी नावे सूपूर्त

मुंबई : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नेमावयच्या नावांचे गुपित अजूनही कायम आहे. राज्य मंत्रीमंडळाने मंजूर केलेली बारा नावे ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे बंद लिफाफ्यातून दिली. राज्यपाल जेव्हा हा बंद लिफाफा उघडतील व या नावांना मंजूरी देतील, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

परब यांनी नावे जाहीर केली नाहीत पण मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा यात समावेश आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांच्या नावांची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे यांचे नाव असल्याचे कळते. गेले काही दिवस या नावांची माध्यमांतून चर्चा आहे. त्यात बानगुडे यांची नव्याने भर पडली आहे. याशिवाय विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांचेही नाव असू शकते.

परब यांच्यसह  वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक हे तिघे जण आज सायंकाळी सहा वाजता राज्यपालांना भेटले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना परब यांनी सांगितले की सर्व कायदेशीर बाजूंची पूर्तता करून हे पत्र आणि शिफारस केलेली नावे राज्यपालांकडे दिली आहेत. ही नावे राज्यपाल मंजूर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही नावे राज्यपालांनी नामंजूर केली तर, या प्रश्नावर हा जरतरचा प्रश्न आहे. त्यामुळे तो आताच विचारण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख