जयंत पाटलांनी प्रेम व्यक्त करताच चंद्रकांतदादांनी गाठली सांगली  - As soon as Jayant Patil expressed his love, Chandrakantdada reached in sangli | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटलांनी प्रेम व्यक्त करताच चंद्रकांतदादांनी गाठली सांगली 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

जयंत पाटील यांचे खासदार संजयकाका पाटील, संभाजी पवार, दिनकर पाटील, विलासराव जगताप या भाजपत असलेल्या नेत्यांवरही विशेष प्रेम आहे.

सांगली : सांगली महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठक घेण्याचे मान्य करताच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल दौरा ठरवत आज (ता. 29 ऑक्‍टोबर) सांगली गाठली. स्थायी समिती सभापतीच्या निवडीवेळी आलेला अनुभव लक्षात घेता दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीच्या वेळी कोणताही दगाफटका नको; म्हणून चंद्रकांतदादांनी सांगलीची घडी विस्कटू नये, याची काळजी घेतली. 

सांगलीच्या महापौर गीता सुतार यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत बैठक घेण्याचे निमंत्रण दसऱ्याला दिले. मंत्री पाटील यांनी बैठक घेण्याचे मान्य केले. मात्र भाजप नेते शेखर इनामदार आणि मकरंद देशपांडे यांच्यावर माझे विशेष प्रेम आहे. ते आले तरच मी बैठकीला येईन, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर इनामदारांनी जयंत पाटलांना आवतण दिले होते. 

जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये महापालिकेत सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीत इनामदार आणि देशपांडे यांचा समावेश होता. या दोघांनाही महत्त्वाची पदे ही भूषवण्याची संधी पाटलांनी दिली होती. 

याच वेळी महापौर सुतार यांनी, "मी पक्ष बघत बसत नाही. साहेब, तुम्ही फक्त माझ्या डोक्‍यावर हात ठेवा,' अशी विनंती पालकमंत्र्यांना केली होती. त्यानंतर भाजप नेते आवक झाले होते. 

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे नेते खडबडून जागे झाले. प्रदेशाध्यक्षांचा तातडीने दौरा ठरला आणि आज चंद्रकांतदादा शहरात दाखल झाले. त्याला नुकतेच झालेली स्थायी समितीच्या सभापतीच्या निवडीचीही घटनाही कारणीभूत आहे. कारण महापालिकेत संपूर्ण बहुमत असूनही सभापती निवडीच्या वेळी मंगेश चव्हाण यांनी भाजपला घाम फोडला होता. चव्हाण यांच्या पाठीशी जयंत पाटलांनी आपली ताकद उभी केली होती. मात्र, चंद्रकांतदादांनी संपूर्ण ताकद पणाला लावत त्या ठिकाणी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याला संधी मिळवून दिली होती. पण, ती देताना पक्षाची पुरती दमछाक झाली होती. 

येत्या दोन महिन्यांत या ठिकाणी महापौरांची निवडणूक होणार आहे. त्यावेळी सत्ता रोखणे भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे. कारण, कारभार करताना आयुक्त आमचे ऐकत नाहीत, अशी तक्रार भाजपचे पदाधिकारी करत आहे आणि ते नाकारताही येत नाही. त्यातच महापौरांची पवित्रा बघता भाजपने तातडीने सांगलीत लक्ष घातले. 

जयंत पाटील यांचे खासदार संजयकाका पाटील, संभाजी पवार, दिनकर पाटील, विलासराव जगताप या भाजपत असलेल्या नेत्यांवरही विशेष प्रेम आहे. त्यानंतर इनामदार, देशपांडेंना हाताशी धरून जयंत पाटलांनी अगोदरच महाविकास आघाडीचा प्रयोग केला होता. त्यामुळे चंद्रकांतदादांनी पावले ओळखत तातडीने सांगली गाठली आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महापालिकेतील घडी विस्कटू नये, याची काळजी घेतलेली दिसते. 

खासदार संजयकाकांच्या अनुपस्थितीची चर्चा​

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नुकताच सांगलीचा नुकसान पाहणी दौरा केला होता. त्या वेळी भाजपचे खासदार संजयकाका पाटील हे हजर नव्हते. त्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यातही खासदार संजयकाका गैरहजर होते. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर "ते खासदार आहेत, दिल्लीत त्यांच्याकडे काही जबाबदारीची कामे असतात. त्यामुळे ते दिल्लीत जास्त वेळ असावेत,' असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी वेळ मारून नेली. मात्र, संजयकाकांच्या अनुपस्थितीची चर्चा मात्र जोरात आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख