शिवसेनेचे मंत्री फोडताहेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक  - Signs of political upheaval in Kurundwad municipality | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

शिवसेनेचे मंत्री फोडताहेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी एकत्र येत आहेत. 

कुरुंदवाड : कुरुंदवाड नगरपालिकेच्या राजकारणात उलथापालथीचे संकेत आहेत. भाजपच्या पुढाकाराने राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या असंतुष्ट नगरसेवकांची मोट बांधण्यात येत असून लवकरच वेगळे समीकरण आकार घेण्याची शक्‍यता आहे. याबाबत नगराध्यक्ष डॅमेज कंट्रोल कसे करतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी एकत्र येत असून शहराच्या रखडलेल्या विकासासाठी भरभक्कम निधीचे आश्‍वासन त्यांना मिळाले आहे. 

ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत, तर युवा नेते व कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विजय पाटील नाराज नगरसेवकांच्या रडारवर आहेत. 

दरम्यान, याच घडामोडींचा भाग म्हणून 12 नगरसेवकांनी मुख्याधिकारी हटाव मोहीम उघडली असून याबाबतचे निवेदन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांना देण्यात येणार आहे. 

नगरपालिकेवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची सत्ता असून कॉंग्रेसचे जयराम पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. सत्तेतील पदांच्या वाटपाचा फॉर्म्युला पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर ठरला आहे. मात्र, चार वर्षांत या ना त्या कारणाने दोन्ही पक्षांत अंतर्गत धुसफूस कायम होती. आता पालिकेची सार्वत्रिक निवडणूक वर्षभरात होणार असून त्याचीही साखरपेरणी नव्या राजकीय घडामोडींच्या माध्यमातून होत आहे. 

विकासाची भली मोठी यादी घेऊन, शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प करून अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवर आली आहे. दरम्यान, महत्त्वाकांक्षी सुधारित नळपाणीपुरवठा योजना रखडली. मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. 

नगरपालिकेतील एका पुत्राचा कारभारातील हस्तक्षेप यामुळे सत्तेतील नगरसेवकांची नाराजी वाढली आहे. ही नाराज मंडळी एकत्र आली असून त्यांना भाजपच्या पाच नगरसेवकांचे पाठबळ आहे. पालिकेत कॉंग्रेस सात, राष्ट्रवादी पाच, तर भाजप पाच असे बलाबल आहे. आता भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे चार आणि कॉंग्रेसचे दोन असे अकरा नगरसेवक शहर बचाव कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी एकत्र येत असून शहराच्या रखडलेल्या विकासासाठी भरभक्कम निधीचे आश्‍वासन त्यांना मिळाले आहे. 

मुख्याधिकारी निखिल जाधव यांची बदली करा, अशी मागणीही नगरसेवकांनी मंत्री यड्रावकर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे लवकरच नगरपालिकेत राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

नगराध्यक्ष सतेज पाटलांचे निकटवर्तीय 

नगराध्यक्ष जयराम पाटील हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे निकटचे मानले जातात. नगरसेवकांची नाराजी ते कशी हाताळतात, यावरच त्यांचे पुढील राजकारण अवलंबून आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख