कोकणातून एकच काय तर ४० मंत्री झाले तरी शिवसेनेला फरक पडत नाही - Shiv Sena's Shiv Sampark Abhiyan started in Kolhapur | Politics Marathi News - Sarkarnama

कोकणातून एकच काय तर ४० मंत्री झाले तरी शिवसेनेला फरक पडत नाही

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 जुलै 2021

त्यामुळेच शिवसेना व नेत्यांच्या बदनामीचे षड्‌यंत्र आखले जात आहे.

कोल्हापूर : कोकणातून कोणी पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही. इतकेच काय तर चार नव्हे चाळीस मंत्री झाले तरी हरकत नाही, असा टोला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता आज (ता. १३ जुलै) लगावला. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान १२ दिवसांत राबवून जे तुम्हाला छळतात, त्यांचे निवडणुकीत बारा वाजविण्यास शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केली. (Shiv Sena's Shiv Sampark Abhiyan started in Kolhapur)

कोल्हापूर येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते. उदय सामंत यांच्या हस्ते ‘गोकुळ’च्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. सुजित मिणचेकर व मुरलीधर जाधव, सामाजिक कार्याबद्दल हर्षल सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसैनिकांना शपथ देऊन अभियानास सुरुवात झाली. 

हेही वाचा : पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या बदलीचा असा रचला प्लॅन

मंत्री सामंत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटात केलेली कामगिरी अतुलनीय आहे. त्यामुळेच शिवसेना व नेत्यांच्या बदनामीचे षड्‌यंत्र आखले जात आहे. याउलट मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी घराघरांत आदर आहे. परिणामी कोणी कितीही शंखध्वनी केला तरी फरक पडत नाही.’’ ते म्हणाले, ‘‘गोकुळच्या राजकारणात शेतकऱ्यांना किती फायदा हे शिवसैनिकांनी पाहावे. त्यासाठी विरोधात जायला लागले तरी ती तयारी ठेवावी.’’

शिवसैनिकांनी घरात बसून याद्या बनवू नये. पक्षावर निष्ठा व प्रेम दाखवले, तर नुकसान होत नाही. आघाडीत गटतट नको, म्हणून शिवसैनिक शांत आहेत. शिवसेनेला संपविण्याची भाषा होते, तेव्हा पक्षाचा पाया आणखी भक्कम होतो. पारदर्शक शिक्षण सम्राट झाले पाहिजेत, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली.

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, ‘‘शिवसैनिकांनी प्रभागातील मान्यवरांचे नंबर मिळवावेत. त्यांच्याशी थेट मुख्यमंत्री बोलतील. जुन्या शिवसैनिकांचा मान सन्मान ठेवून पक्षवाढीसाठी प्रयत्न करा. पदे खुर्च्या उबवायला दिलेली नाहीत. पक्षाशी तडजोड केली जाणार नाही.’’ 

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘नारायण राणे, राज ठाकरे शिवसेनेला सोडून गेले. त्या वेळी शिवसेनेला काही फरक पडला नाही, उद्धव ठाकरे एकटे होते. आता मुख्यमंत्री पदावरून ते शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. कोल्हापूर महापालिकेवर आता नियोजन करून ध्वज फडकविण्यासाठी सज्ज होऊया.’’ डॉ. मिणचेकर, शहरप्रमुख रविकिरण इंगवले व विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी माजी आमदार सत्यजित पाटील, अरुण सावंत, ऋतुराज क्षीरसागर, मंगल साळोखे, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, नियाज खान, किशोर घाटगे, चेतन शिंदे, पियूष चव्हाण, विश्वदीप साळोखे, अविनाश कामते, योगेश चौगले उपस्थित होते. अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत हारुगले यांनी आभार मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख