जयंत पाटलांविरोधात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची उद्धव ठाकरेंकडे तक्रार  - Shiv Sena sangli district chief's complaint against Jayant Patil to Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटलांविरोधात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची उद्धव ठाकरेंकडे तक्रार 

अजित झळके 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

पक्षातील प्रमुख नेत्यांना "नॉट टू बी नोटिसेबल' म्हणून बेदखल करणाऱ्या जयंतरावांकडून येथे शिवसेनेला दखलपात्रतेची अपेक्षा आहे.

सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील शिवसेनेचे खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला. शिवसेनेची ही तक्रार याआधी भाजपसोबत युतीची सत्ता असतानाही होती आणि आता नव्याने साकारलेल्या महाविकास आघाडीतही कायम आहे. या खच्चीकरणास जबाबदार कोण, याचा शोध शिवसेनेलाच घ्यावा लागेल. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंगेसची सत्ता आहे. त्यामुळे एकमेकांच्या पक्षातील नेते फोडायचे नाहीत, हा अलिखित करार या तीन पक्षांत झालेला आहे. शिवाय, सहकारी पक्षांना सांभाळून पुढे जाण्याचीही अपेक्षा आहे. तीच अपेक्षा संजय विभुते यांनी जयंत पाटील यांच्याकडून ठेवली आहे. परंतु, पक्षातील प्रमुख नेत्यांना "नॉट टू बी नोटिसेबल' म्हणून बेदखल करणाऱ्या जयंतरावांकडून येथे शिवसेनेला दखलपात्रतेची अपेक्षा आहे. जयंतरावांची कार्यशैली पाहता त्याकडे ते किती गांभीर्याने पाहतील, याविषयी शंका आहेत. 

शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद, विस्तार आणि त्यासाठीचा झपाटा मर्यादित आणि संकुचित आहे. जिल्ह्यात एक आमदार, जिल्हा परिषदेचे तीन सदस्य, एका पंचायत समितीवर सत्ता या साऱ्या अनिल बाबर यांच्या व्यक्तिकेंद्रीत सत्ता आहेत. नाही म्हणायला पालिकेत काही नगरसेवक आहेत. आता पक्षाची ताकद वाढणार कशी? पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाही शिवसेना दखलपात्र होण्यासाठी का झपाटा लावत नाही, याचे उत्तर आधी शोधावे लागेल. त्यासाठी जयंत पाटील यांची मदत कशी मिळेल? 

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली युतीची सत्ता असताना जिल्ह्यात शिवसेनेला दुय्यम स्थान होते. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सेना नेत्यांना कोपऱ्यातच स्थान दिले होते. नव्या सत्तेत तेच सुरू आहे. आपल्यावर ही वेळ का येते, याची तपासणी शिवसेनेने करायला हवी. 

सत्तेचा वापर करून पक्ष विस्ताराचे सर्वपक्षीय धोरण असते. सध्या प्रवेश सोहळे, शासकीय समित्यांवर नियुक्‍त्या, विविध प्रश्‍नांची सोडवणूक यासाठी बैठका सुरू आहेत. त्यात शिवसेनेला फारसे महत्त्व मिळेनासे झाले आहे. निवडींमध्ये संधी नाही, बैठकांना बोलावले जात नाही, असा शिवसेनेचा आरोप आहे. तो एका अर्थाने खराही आहे. 

"राष्ट्रवादी'ने नैसर्गिक मित्र कॉंग्रेसमधील नेत्यांना पक्षात प्रवेश देत इथल्या राजकारणात खळबळ उडवून दिली. शिवसेना तर "राष्ट्रवादी'ची नैसर्गिक मित्रही नाही. त्यामुळे जयंतरावांकडून ताकद मिळावी, ही अपेक्षा व्यर्थ आहे. अर्थात, खच्चीकरण थांबेलही, मात्र उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतले तर... मात्र त्यांनी मनावर घ्यावे, असे सांगलीच्या शिवसेनेचे कर्तृत्व काय? 

शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे जयंतरावांशी फारसे सख्य नाही. खानापूर मतदारसंघातील माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना "राष्ट्रवादी'त प्रवेश दिल्याने राजकीय संघर्षच होणार आहे. "राष्ट्रवादी'चा एक आमदार वाढविण्यासाठी जयंतराव शक्‍य ते प्रयत्न करून बाबर आणि पर्यायाने शिवसेनेची कोंडी करतील. दुसरीकडे इस्लामपुरात मात्र जयंतराव शिवसेनेला गोंजारत आले. त्यामुळे शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांना विभुतेंप्रमाणे जयंतराबांबद्दल तक्रार नसावी. 

मिरजेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला संधी 

मिरज विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा एकेकाळचा प्रभावी गड. तेथे सेनेची ताकद, वचक होता. मात्र 2009 मध्ये दंगल झाली. संधी मोठी होती, पण शिवसेनेच्या हातून हा मतदारसंघ निसटला. भाजपकडून खच्चीकरणाचे ते टोक होते. आता भाजपशी पुन्हा संसाराची शक्‍यता कमी आहे. अशावेळी मिरजेत कॉंग्रेस आणि "राष्ट्रवादी'पेक्षा शिवसेनेला वाढीची संधी जास्त आहे. पक्षाची ताकद वाढली तर खच्चीकरणाची वेळ येणार नाही. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख