पोलिसांनी अडवलेल्या महिलांना शरद पवारांनी व्यासपीठासमोर बसविले  - Sharad Pawar inspects pomegranate orchard in Atpadi | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांनी अडवलेल्या महिलांना शरद पवारांनी व्यासपीठासमोर बसविले 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

शरद पवार यांनी 40 वर्षांपूर्वी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत आटपाडीचा भाग पिंजून काढला होता.

आटपाडी : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (ता. 13 नोव्हेंबर) आटपाडी तालुक्‍यातील खानजोडवाडी येथील निर्यातक्षम डाळिंब बागांची पाहणी केली. बागांची पाहणी करताना मातीचे खूप जवळून निरीक्षण केले. त्याचा उल्लेख "माती चांगली आहे. यामुळे घरे गळत नाहीत', असा केला. पोलिसांनी काही महिलांना व्यासपीठालगत अडवले होते. ते लक्षात येताच पवारांनी पोलिसांना बोलावून महिलांना सर्वात पुढे बसवण्याची सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी महिलांना पुढे बसवले. 

पवार यांनी खानजोडवाडी येथील डाळिंब बागांची पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी वरील घटना घडली. पवार म्हणाले की राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून डाळिंब आणि द्राक्षबागांच्या संरक्षणासाठी अनुदान तत्त्वावर शेडनेट देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्‍न मार्गी लावू. तसेच, सामुदायिक निर्णय, ऐक्‍य, एकत्रित निर्णय असे काम करून खानजोडवाडीतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यासमोर आदर्श ठेवला आहे, असे कौतुकही त्यांनी केले. 

"खानजोडवाडीचा आदर्श राज्यातील शेतकऱ्यांनी घेऊन एकाच वेळी हंगाम धरावा. दररोज बैठका घेऊन औषध फवारणी, इतर कामे निश्‍चित करून एकाच वेळी करा. रोगराई कमी राहते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी येतो. तो शेतीच्या कोणत्या योजनांसाठी खर्च करावा, याचा निर्णय राज्य सरकारने स्थिती पाहून घ्यावा. त्याच योजनेतून अनुदान तत्त्वावर शेडनेट, अच्छादन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करणार आहे. डळिंबाच्या प्रभावी मार्केटिंगसाठी जोमाने काम करेन,'' असे पवार यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी हेलिपॅडवर त्यांचे स्वागत केले. डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, पालकमंत्री जयंत पाटील, आमदार अनिल बाबर, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, अरुण लाड, माजी आमदार सदाशिवराव पाटील, दीपक साळुंखे, रोहित पाटील उपस्थित होते. संघाचे सचिव आनंदराव पाटील यांच्या निवासस्थानीही त्यानी भेट दिली. 

शेतकऱ्यांसोबत संवादसभा झाली. पालकमंत्री पाटील, बाबर, चांदणे आणि शामराव सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.

पवार यांनी बारामतीत तेल्याने बाग वाया गेल्याचा अनुभव सांगितला. कमी पाण्यावर येणाऱ्या फळांकडे वळा, असे आवाहन त्यांनी केले. सरपंच रामदास सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. शिवसेनेचे तानाजीराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, भारत पाटील, बाबासाहेब मुळीक उपस्थित होते. 

आठवणींना उजाळा 

शरद पवार यांनी 40 वर्षांपूर्वी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत आटपाडीचा भाग पिंजून काढला होता. त्या आठवणींना उजाळाही दिला. गलाई व्यावसायिक, आटपाडीची सर्कस, डाळिंब आदींवर त्यांनी प्रकाश टाकला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख