शरद पवार सरकारवर अंकुश ठेवण्यात कमी पडले : चंद्रकांत पाटील - Sharad Pawar failed to control the government : Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार सरकारवर अंकुश ठेवण्यात कमी पडले : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 जून 2021

त्यामुळे महाराष्ट्राचे आर्थिक व वैद्यकीय नुकसान झाले.

कोल्हापूर : राज्य सरकारवर अंकुश ठेवायला ज्येष्ठ नेते शरद पवार कमी पडले. ते जर आता नाराज असतील, तर त्यांनी त्यासाठी उशीर केला. त्यामुळे महाराष्ट्राचे आर्थिक व वैद्यकीय नुकसान झाले, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. ३० जून) येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (Sharad Pawar failed to control the government : Chandrakant Patil)

पाटील म्हणाले, ‘‘तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवले. सत्तेतील ज्या त्या जातींच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जातींना न्याय मिळवून दिला. मराठा समाजातील नेत्यांनी ते केले नाही. बँका, पतसंस्था, कारखान्यांत त्यांची सत्ता असताना त्यांनी ‘सेल्फ डिक्लेअर रिझर्व्हेशन' म्हणून किती मराठा तरुणांना नोकरीत सामावून घेतले. शरद पवार, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी मराठा समाजासाठी काय केले. या नेत्यांनी एकदा त्यांची प्रॉपर्टी जाहीर करावी.’’

हेही वाचा : दगडफेकीनंतर पडळकर म्हणाले, गोळ्या घातल्या तरी मी गप्प बसणार नाही

स्कूटरवरून फिरणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांनी शासकीय जागा घेऊन महाविद्यालये बांधली. परराज्यातील विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी शुल्क आकारून प्रवेश दिला. त्या वेळी त्यांना मराठा विद्यार्थ्यांची चिंता नव्हती का, असा सवाल करून पाटील म्हणाले, लोणावळ्यात ओबीसी मेळाव्यात मागासवर्ग आयोगाचे तीन सदस्य सहभागी झाले. त्यांना तसे हजर राहता येते का, या संदर्भातं काय कारवाई करणार याचा खुलासा राज्य सरकारने करावा.

हा लोकशाहीचा खून

अधिवेशनात मराठा विषयावर प्रश्न विचारायचे नाहीत. त्याला लेखी उत्तरे मिळणार नाहीत, असे सरकारने कळवले. हा लोकशाहीचा खून असून, या अधिवेशनात केवळ पुरवण्या मागण्यांबाबत चर्चा होणार आहे. जे आमदार दोन दिवसीय अधिवेशनाची मागणी करत होते, तेच आता सरकार सकारात्मक असल्याचे सांगत आहेत. ते कसे काय, असेही  पाटील म्हणाले.

शिष्यवृत्तीचं काय...?

सारथी उपकेंद्रात दोन लिपिक नेमून कामकाज सुरू केले आहे. मात्र, सारथीचे तारादूत, एमपीसी व यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती, वसतिगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची २५ लाख रुपये कर्ज मर्यादा याचे काय झाले, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले. 

क्रेडिटमध्ये इंटरेस्ट नाही

मराठा आरक्षणासाठी असंख्य संघटना काम करत आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वावर अजूनही लोकांचा विश्वास आहे. समाजाला न्याय मिळावा, ही माझी भूमिका आहे. क्रेडीटमध्ये मला इंटरेस्ट नाही. आरक्षणाच्या प्रश्‍नात भाजपचे आमदार सहभागी झाले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पाटील म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख