शरद पवारांनी वचन पाळले नाही; तर...  - Sharad Pawar did not keep his promise; So ... | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांनी वचन पाळले नाही; तर... 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

ए. वाय. पाटील जो निर्णय घेतील, त्या निर्णयाशी बांधील राहू.

सोळांकूर (जि. कोल्हापूर) : विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या त्यागाला न्याय देणार, असे वचन दिले होते. हे वचन पवार यांनी पाळले नाही तर ए. वाय. यांनी कोणताही निर्णय घ्यावा. त्या निर्णयाशी आम्ही बांधील राहू, असा आक्रमक सूर अनेक कार्यकर्त्यांनी मेळाव्यात लावला.

मात्र, ए. वाय. यांनी "राजकारणात घाईगडबडीने निर्णय घेऊन चालत नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल,' असा सबुरीचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. 

सोळांकूर (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथे तालुक्‍यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ए. वाय. पाटील बोलत होते. या वेळी कार्यकर्त्यांनी विधान परिषदेची संधी मिळाली नाही, तर ए. वाय. पाटील जो निर्णय घेतील, त्या निर्णयाशी बांधील राहू, असा पवित्रा घेतला. त्या वेळी पाटील यांनी "राजकारणात घाईगडबडीने निर्णय घेऊन चालत नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल. आपले दैवत मुश्रीफ यांच्यावर विश्वास ठेवून काम करत राहू,' असा सबुरीचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

पाटील म्हणाले की, हसन मुश्रीफ राजकारणात पळा म्हणाले तर पळणार, थांबा म्हणाले तर थांबणार. आता फक्त माझ्या कार्यकर्त्याला आणि मला काय पाहिजे, याचा विचार केला जाईल. तालुक्‍यातील सामान्य कार्यकर्त्यांमुळेच मी नेता झालो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक नंबरचे संघटन केले. सर्वसामान्य कार्यकर्त्याला विविध सहकारी संस्थांमध्ये पदाची संधी दिली.

आगामी काळात जिल्हा बॅंक, गोकुळ, बाजार समिती, तालुक्‍यातील 19 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. प्रत्येक गावातील पक्ष्यांच्या सर्व गटांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकावा, असे आवाहन ए. वाय. पाटील यांनी केले. 

भिकाजी एकल यांनी स्वागत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किसन चौगुले यांनी प्रास्ताविक केले. बाजार समिती प्रशासक सदस्य आर. वाय. पाटील, पंचायत समिती उपसभापती मोहन पाटील यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

या मेळाव्यात राजाराम पाटील, जयसिंग हुजरे, बंडोपंत किरूळकर, शंकर डोंगळे, संजयसिंह कलिकते, महादेव कोथळकर, फिरोजखान पाटील, संचालक युवराज वारके, एकनाथ पाटील, नेताजी पाटील, शिवाजी पाटील, सचिन पाटील, गोविंद चौगुले, बापूसाहेब पाटील, विश्वास पाटील, नंदू पाटील, स्वप्नील पाटील, चंद्रकांत संकपाळ उपस्थित होते. राम इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. मोहन पाटील यांनी आभार मानले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख