शिवसैनिक जगला काय अन्‌ मेला काय?; कोणाला काही देणे-घेणे नाही - Senior Shiv Sena leaders are not paying attention of Shiv Sainiks  and organization  : Shashikant Cholake | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

शिवसैनिक जगला काय अन्‌ मेला काय?; कोणाला काही देणे-घेणे नाही

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

या साऱ्याला शिवसेनेचे वरिष्ठ नेतेच जबाबदार आहेत.

चिपळूण  ः शिवसेनेत स्थानिक पातळीवर वरिष्ठ नेत्यांचे लक्ष नाही. संघटना आणि शिवसैनिक जगला काय आणि मेला काय, याचे कोणालाच देणे-घेणे नाही. वरिष्ठ नेत्यांची जर अशीच भूमिका राहिली, तर शिल्लक असणारी शिवसेनाही ही रसातळाला जाईल. ती पुन्हा उभी राहणेही कठीण आहे. या साऱ्याला शिवसेनेचे वरिष्ठ नेतेच जबाबदार असल्याचे मत शिवसेना उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (Senior Shiv Sena leaders are not paying attention of Shiv Sainiks  and organization  : Shashikant Cholake)

चिपळूण शिवसेनेस मरगळ आली आहे. नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संघटनेचे आणि शिवसैनिकांचे काहीही देणे-घेणे राहिलेले नाही. अंतर्गत वाद नुकतेच उघड झाले आहेत, तर संघटनेची वाटचाल थंडावली आहे. या साऱ्या गोष्टी सहन न झाल्याने चिपळूणमध्ये शिवसेना उभे करणारे व सध्याचे उपजिल्हाप्रमुख चाळके यांनी मनातील खदखद आज (ता. ५ जुलै) व्यक्त केली. 

हेही वाचा : नाणारचे समर्थन करत शेकडो शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश

चाळके म्हणाले, ‘‘दहा वर्षांनंतर विधानसभेला शिवसेनेचा पराभव झाला. त्यानंतरतरी वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतली का. आम्ही उपाशीपोटी रात्रीचा दिवस करून संघटना उभी केली. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याची माहिती आहे. आज शिवसेनेची अवस्था बघा काय आहे. शिवसैनिक निराशेच्या गर्तेत आहेत. कोणाचा कोणाला पायपोस राहिला नाही. चिपळूण शिवसेनेत निष्ठावंत शिवसैनिकांना किंमत राहिलेली नाही. निष्ठेच्या नावाखाली शिवसैनिक काम करतील, असा भ्रम झाला आहे. शिवसैनिक आता या साऱ्यांचे खेळ बघून घेत आहे. कोणाच्या निष्ठा कुठे आणि कशासाठी आहेत, हे आता ओळखले असून, शिवसैनिक त्यांना योग्य जागा दाखवेल; मात्र त्यामध्ये शिवसेनेचे नुकसान होणार आहे.’’ 
 

चिपळूणला शिवसेना उभी करण्यासाठी खऱ्या अर्थाने माजी मंत्री रामदास कदम यांनी मेहनत घेतली. आता मात्र हांजी हांजी करणारा आता निष्ठावंत होत असल्याचे दुर्दैव आहे. अशीच अवस्था राहिली तर संघटना रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही. मी नेत्यांना सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आम्ही भोगले, सोसले आहे; याची दखल न घेतल्यास मी या विरोधात उठाव करेन.
- शशिकांत चाळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख