कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांवर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्हालाही कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांना बंदी घालावी लागले, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिला. कर्नाटकच्या वाहनबंदीबाबत मुख्य सचिव व कर्नाटक सरकारशीही चर्चा करुन बंदीचा निर्णय मागे घ्यायला किंवा यावर पर्याय काढायला लावू, असेही पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सतेज पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारी वाहतूक कोगनोळी येथे थांबविण्यात आली आहे. सर्व वाहनांना कर्नाटक बंदी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहतूकदारांची कोरोना चाचणी महाराष्ट्रात झाली पाहिजे, अशी कर्नाटक सरकारची अपेक्षा आहे.
वास्तविक कर्नाटक सरकारला या लोकांना कर्नाटकमध्ये घ्यायचे नसेल तर त्यांनीच चाचणी केली पाहिजे. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. चाचणी घेण्याची जबाबदारी कर्नाटकने घ्यावी आणि त्यांना क्वारंटाईन करण्याची भूमिका घ्यावी. मुंबई विमानतळावर देश, परदेशातून लोक येतात. त्यावेळी राज्य शासन त्यांची जबाबदारी घेते. त्यांच्या चाचण्या घेतात. कर्नाटकने आपली जबाबदारी दुसऱ्यावर न ढकलता स्वत:वर घ्यावी. पण वाहतूक बंदी घालणे योग्य ठरणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक हद्दीत आलेल्या वाहतूकदारांची चाचणी कर्नाटक सरकारनेच केली पाहिजे. कर्नाटक सिमेवर अनेक ठिकाणाहून लोक येतात. या ठिकाणी लोक थांबून राहिले तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. याचा विचार करुन त्यांनी आपला निर्णय मागे घेतला पाहिजे. सध्या पुणे मुंबईसह इतर राज्यातून लोक कोगनोळी येथे येत आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारने या सर्वांची जबाबदारी घेतली पाहिजे, असेही आवाहन पाटील यांनी केले.
वाहतूक कोंडी होईल
गुजरात, मुंबई, पुणेसह इतर ठिकाणाहून कर्नाटकमध्ये जाण्यासाठी येणारी वाहने कोगनोळी येथे थांबून राहिली तर मोठी गर्दी होईल. वाहतूक कोंडीमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. यामुळे तातडीने यावर निर्णय घ्यावा लागले, असेही पाटील यांनी सांगितले.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.