सतेज पाटलांनी मूळ विषयाला बगल देऊन दिशाभूल थांबवावी : धनंजय महाडिक 

पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांचे कार्यकर्ते पत्रकार परिषद घेवून धादांत खोटे बोलत आहेत.
Satej Patil should stop misleading by sidestepping the original subject: Dhananjay Mahadik
Satej Patil should stop misleading by sidestepping the original subject: Dhananjay Mahadik

कोल्हापूर : डी. वाय. पी. सिटी मॉलमधील भाडयाने दिलेल्या मिळकती स्वतःच्या वापरात दाखवून पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा घरफाळा बुडवला आहे. हा जुना विषय असल्याचे ते सांगत आहेत. पण 2014 ते 2021 या कालावधीतील सुमारे पंधरा कोटी रुपयांचा घरफाळा कधी भरणार, हे जाहीर करून त्यांनी जुना विषय संपवावा. नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभूल करू नये. थकीत घरफाळा कधी भरणार हे आधी पालकमंत्र्यांनी स्पष्ट करणे आवश्‍यक असल्याचे पत्रक माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धिस दिले आहे.

महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे की, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांचे कार्यकर्ते पत्रकार परिषद घेवून धादांत खोटे बोलत आहेत. आता तर महापालिका प्रशासनावर खापर फोडून स्वतःचा बचाव करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. वास्तविक 24 ऑक्‍टोबर 2014 रोजी महानगरपालिकेने डी. वाय. पाटील हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांना पत्र लिहून माहिती सादर करण्याबाबत कळवले होते. त्यानंतर 18 ऑक्‍टोबर 2019 ला संजय ज्ञानदेव पाटील यांना महानगरपालिकेने पत्र पाठवून मिळकतीमधील भाडेवापर माहिती आणि करारपत्र सादर करण्याबाबत कळवले आहे. महापालिकेचे कर्मचारी घरफाळा आकारणीसाठी गेल्यावर त्यांच्यावर दबाव टाकून दमदाटी केली जाते. जर पालकमंत्री घरफाळा भरत नसतील, तर सामान्य जनतेने घरफाळा का भरायचा, असा थेट प्रश्‍न असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा  ः धनंजय महाडिकांनी रोजगार दिलेल्या पाच हजार जणांची नावे जाहीर करावीत

कोल्हापूर ः माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून भीमा उद्योग समूहामध्ये पाच हजार लोकांना रोजगार दिले असतील तर त्या पाच हजार लोकांची नावे महाडिक यांनी जाहीर करावीत. पाच हजार लोकांना रोजगार देण्याइतपत भीमा उद्योग समूह मोठा आहे का? असा सवाल कोल्हापूरचे माजी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण आणि माजी नगरसेवक तोफिक मुल्लाणी या कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की स्वतः माजी खासदार धनंजय महाडिक भोगवटादार असलेल्या भीमा एज्युकेशन सोसायटीचा कागल नगरपालिकेचा घरफाळा त्यांनी का भरलेला नाही? पंढरपूरच्या भीमा साखर कारखान्यातील शेतकरी, कर्मचारी यांची कोट्यवधी रुपयांची देणी का भागवली नाहीत? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.   

आशिष ढवळे यांनी आम्हाला महापालिकेच्या हिताबाबत शिकवू नये. उलट घोडेबाजार करून स्थायी सभापती झालेल्या ढवळे यांनी काय काम केले. याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. खासदार असताना धनंजय महाडिक यांनी पाच वर्षात महापालिकेला किती निधी दिला? अठरा वर्षे विधान परिषदेचे आमदार असणाऱ्या महादेवराव महाडिक यांनी शहरासाठी किती निधी दिला? शहराच्या विकासासाठी महाडिक यांनी एकतरी सार्वजनिक हिताचा प्रकल्प सुरू केला आहे का? याची माहिती कोल्हापूरच्या जनतेला द्यावी. रोजगार देण्याऐवजी तो काढून घ्यायचे काम माजी खासदार यांनी केले आहे, असा आरोपही या माजी नगरसेवकांनी केला आहे.

भीमा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू असलेले विकासवाडी येथील इंजिनीरिंग कॉलेज बंद पडले आणि त्या ठिकाणी काम करत असलेल्या लोकांचा रोजगार गेला. त्यांना कित्येक महिने पगारसुद्धा मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती असताना त्यांनी पाच हजार रोजगार दिले, हे म्हणणे कितपत खरे आहे? असा सवाल कॉंग्रेसच्या नेत्यांनी या पत्रकातून केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com