Raju Shetty slams Central Government over Agriculture acts
Raju Shetty slams Central Government over Agriculture acts

... तर केंद्र सरकारला रस्त्यावर आणू; राजू शेट्टी यांचा इशारा

केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले कृषी कायदे मोठ्या उद्योजकांच्या फायद्याचे आहेत. याच उद्योजकांनी राजकीय पक्षांना गुलाम बनवले आहे. त्यांच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले जात आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले कृषी कायदे मोठ्या उद्योजकांच्या फायद्याचे आहेत. याच उद्योजकांनी राजकीय पक्षांना गुलाम बनवले आहे. त्यांच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले जात आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे तात्काळ रद्द करावे, अन्यथा केंद्र सरकारलाच रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी  यांनी केली. दिल्लीतील आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर हीच फौज दिल्लीच्या दिशेने कुच करेल असा इशाराही त्यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली ते कोल्हापूर दरम्यान 80 किलोमीटर अंतरावर ट्रॅक्‍टर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. चुकीचे कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, अदाणी-अंबानींचे हस्तक असणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना उध्दवस्त करणारे कृषी कायदे रद्द झाले पाहिजे, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरूवात झाली. 

कोल्हापूर येथील दसरा चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन मोर्चा विसर्जित करण्यात आला. सांगली येथून निघालेला मोर्चा जयसिंगपूर, हातकणंगलेमार्गे कोल्हापुरातील दसरा चौकात मोर्चा विसर्जित केला. यावेळी, प्रत्येक गावात या मार्चाचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रविण जनगोंडा, विक्रम पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, सौरभ शेट्टी उपस्थित होते. दसरा चौक येथे शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

शेट्टी म्हणाले, नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. प्रसंगी बळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करू, सरकारला सळो की पळो करून सोडले जाईल. दिल्लीत कृषी कायद्याला विरोधासाठी प्रजासत्ताकदिनी शेतकरी ट्रॅक्‍टर परेड करणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे होते, पण रेल्वेचा मार्ग बंद केला आहे. दक्षिणेकडील शेतकरी येऊ नये यासाठी वाहने रोखली आहेत. त्यामुळे आम्ही इथे ट्रॅक्‍टर मोर्चा काढतोय. 

केंद्राने कृषी कायदे लादू नयेत. कृषी कायद्याला विरोध करणारे मुठभर शेतकरी असल्याचे सरकार भासवत आहे. राजकीय पक्षांना गुलाम केले आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र केंद्र सरकार इंग्रजांप्रमाणे वागत आहे. कवडीमोलाने शेतीमाल खरेदी करून चौपट दराने विक्री होईल. कायद्याने आमचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार सरकार करत आहे. दिल्लीतील आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर हीच फौज दिल्लीच्या दिशेने कुच करेल अशा इशाराही शेट्टी यांनी दिला.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com