मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नात लोकप्रतिनिधी दिसत नाहीत : संभाजीराजे  - People's representatives do not appear in the question of Maratha reservation: Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नात लोकप्रतिनिधी दिसत नाहीत : संभाजीराजे 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

येत्या 27 ऑक्‍टोबरला मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे.

कोल्हापूर : मराठा आरक्षण हा समतेचा लढा असून, तो न्यायालयीन लढाईच्या जोरावर जिंकावा लागेल, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (ता. 25 ऑक्‍टोबर) कोल्हापूर येथे केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नात लोकप्रतिनिधी दिसत नाहीत, असा टोला लगावत त्यांनी लोकप्रतिनिधींनी त्यांचे कार्यक्रम बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. 

सकल मराठा कोल्हापूरतर्फे आयोजित दसरा मराठा मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी मराठा आरक्षणाची आवश्‍यकता स्पष्ट करताना गरीब मराठा समाजाची स्थिती हलाखीची असल्याचे सांगितले. शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात मेळाव्याचे आयोजन केले होते. 

संभाजीराजे म्हणाले, ""राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला 1902 रोजी आरक्षण दिले होते. त्यात मराठा समाजाचादेखील समावेश होता. महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या मोठी असून, 85 टक्के मराठा समाज गरिबीशी झुंज देत आहे. अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी आहेत. समाजातील मुला-मुलींना शिक्षण व नोकरीत स्थान मिळविताना संघर्ष करावा लागत आहे. एकेक गुणासाठी त्यांनी अहोरात्र अभ्यासात झोकून द्यावे लागत आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागेल.'' 

ते म्हणाले की, येत्या 27 ऑक्‍टोबरला मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाची भक्कमपणे बाजू मांडणे महत्त्वाचे आहे. मराठा समाजाने कायदा हातात न घेता न्यायालयीन लढाईला सामोरे जाण्याची ही वेळ आहे, हे लक्षात घ्यावे. कोल्हापूर जिल्हा दिशा देणारा असून, आरक्षणाच्या लढ्यासाठी जिल्ह्याने पुढाकार घ्यावा. शाहू नगरीतून उठणारा आवाज दिल्लीपर्यंत पोचतो. 

प्रसाद जाधव यांनी मराठा समाज लढवय्या असून, आरक्षणासाठी समाजाला सीमोल्लंघन करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. 

या प्रसंगी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, नगरसेवक अजित राऊत, शिवाजी जाधव, विक्रम जरग, श्रीकांत भोसले, बाबा महाडिक, बारा बलुतेदार संघटनेचे उमेश पोर्लेकर, वसंतराव वाठारकर, रणजित पोवार, संजय ओतारी, तानाजी मर्दाने, सलीम पटवेगार, शिवमूर्ती इंगळे, संदीप डोणे, अरूण नरळे, गोरख गवळी, बाळू लिंगम उपस्थित होते. 

मराठा आरक्षण मिळेपर्यंत शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर जिल्ह्याचे केंद्र असेल. तेथे मराठा समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी मराठा बांधव कार्यरत राहतील. मराठा बांधवांनी तेथे संपर्क साधावा, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख