गोकुळ निवडणुकीत पाटील, मुश्रीफ, कोरे युनिटी कायम : सतेज पाटील  - Patil, Mushrif, Kore Unity in Gokul elections : Satej Patil | Politics Marathi News - Sarkarnama

गोकुळ निवडणुकीत पाटील, मुश्रीफ, कोरे युनिटी कायम : सतेज पाटील 

सुनील पाटील 
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

कोणी किती आणि काहीही म्हटले तरीही गोकुळमध्ये सत्ता बदल हा होणार, हे निश्‍चित आहे.

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेली युनिटी कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतही कायम असणार आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर याचे नियोजन आहे. त्यामुळे, कोणी किती आणि काहीही म्हटले तरीही गोकुळमध्ये सत्ता बदल हा होणार, हे निश्‍चित आहे, असा विश्‍वास गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. 

कोल्हापूर प्रेस क्‍लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी गोकुळ संबंधीत विचारलेल्या प्रश्‍नाला सतेज पाटील यांनी उत्तर दिले. 

पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारवड असणाऱ्या गोकुळचा कारभार चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. गाय व म्हैशींच्या दुधाला अपेक्षीत दर मिळत नाही, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे गोकुळच्या आगामी निवडणुकीत सत्तांतर करण्याचे सभासदांनीही ठरवले आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्तीसह इतर दिग्गजही या "युनिटी'सोबत असणार आहेत. 

गोकुळची निवडणूक जाहीर होताच ही सर्व यंत्रणा गतिमान होईल. गोकुळ निवडणुकीबाबत आमच्या "युनिटी' बाबात अनेक ठिकाणी बोलले जाते. पण, कोणी काहीही म्हटले तरीही ही युनिटीच गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन करणार आहे, असा विश्‍वासही पाटील यांनी व्यक्त केला. 

मौलाना आझाद महामंडळाला निधी देण्याची मुश्रीफांकडे मागणी 

गडहिंग्लज : अल्पसंख्याक तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने स्थापन केलेल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 2016 पासून एक रुपयाही मिळालेला नाही. या महामंडळाला महाविकास आघाडी सरकारने भरीव निधी द्यावा, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनने केली. 

याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. अल्पसंख्याक समाज हा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. हे मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे मुस्लिम, ख्रिस्ती, जैन, बौद्ध, शिखधर्मीय अल्पसंख्यांक तरुणांना रोजगार मिळावा व त्यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने व्यावसायिक कर्ज म्हणून अल्प व्याजदराने दोन लाखांचे कर्ज दिले जात होते. मात्र 2016 पासून एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही, तो मिळावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख