धनंजय महाडिकांनी रोजगार दिलेल्या पाच हजार जणांची नावे जाहीर करावीत - The names of 5,000 people employed by Dhananjay Mahadik should be announced | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय महाडिकांनी रोजगार दिलेल्या पाच हजार जणांची नावे जाहीर करावीत

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 7 मार्च 2021

खासदार असताना धनंजय महाडिक यांनी पाच वर्षात महापालिकेला किती निधी दिला?

कोल्हापूर : माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून भीमा उद्योग समूहामध्ये पाच हजार लोकांना रोजगार दिले असतील तर त्या पाच हजार लोकांची नावे महाडिक यांनी जाहीर करावीत. पाच हजार लोकांना रोजगार देण्याइतपत भीमा उद्योग समूह मोठा आहे का? असा सवाल कोल्हापूरचे माजी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण आणि माजी नगरसेवक तोफिक मुल्लाणी या कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की स्वतः माजी खासदार धनंजय महाडिक भोगवटादार असलेल्या भीमा एज्युकेशन सोसायटीचा कागल नगरपालिकेचा घरफाळा त्यांनी का भरलेला नाही? पंढरपूरच्या भीमा साखर कारखान्यातील शेतकरी, कर्मचारी यांची कोट्यवधी रुपयांची देणी का भागवली नाहीत? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.   

आशिष ढवळे यांनी आम्हाला महापालिकेच्या हिताबाबत शिकवू नये. उलट घोडेबाजार करून स्थायी सभापती झालेल्या ढवळे यांनी काय काम केले. याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. खासदार असताना धनंजय महाडिक यांनी पाच वर्षात महापालिकेला किती निधी दिला? अठरा वर्षे विधान परिषदेचे आमदार असणाऱ्या महादेवराव महाडिक यांनी शहरासाठी किती निधी दिला? शहराच्या विकासासाठी महाडिक यांनी एकतरी सार्वजनिक हिताचा प्रकल्प सुरू केला आहे का? याची माहिती कोल्हापूरच्या जनतेला द्यावी. रोजगार देण्याऐवजी तो काढून घ्यायचे काम माजी खासदार यांनी केले आहे, असा आरोपही या माजी नगरसेवकांनी केला आहे.

भीमा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू असलेले विकासवाडी येथील इंजिनीरिंग कॉलेज बंद पडले आणि त्या ठिकाणी काम करत असलेल्या लोकांचा रोजगार गेला. त्यांना कित्येक महिने पगारसुद्धा मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती असताना त्यांनी पाच हजार रोजगार दिले, हे म्हणणे कितपत खरे आहे? असा सवाल कॉंग्रेसच्या नेत्यांनी या पत्रकातून केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख