राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम म्हणतात, "मी तुमचाच, जिथं बोलवाल तिथं तुमच्यासोबत असेन'  - MLA Shekhar Nikam says, "I am yours, I will be with you wherever you call" | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम म्हणतात, "मी तुमचाच, जिथं बोलवाल तिथं तुमच्यासोबत असेन' 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

चिपळूण नगरपालिकेत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय वाद सुरू आहे.

चिपळूण : "नगरपालिकेतील महाविकास आघाडीला जिथे गरज असेल तिथे मी उभा राहीन. मी तुमचाच आहे,' असा शब्द चिपळूणचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला दिला. आमदार निकम हेही आता महाविकास आघाडीच्या बरोबर असल्याने आघाडीला आणखी बळ मिळाले आहे. 

चिपळूण नगरपालिकेत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय वाद सुरू आहे. भाजपच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारींमध्ये 19 कामांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या तक्रारींची दखल घेऊन त्या 19 कामाबाबत चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा हा निकाल महाविकास आघाडीला समाधानकारक वाटला नाही; म्हणून कॉंग्रेसचे नगरसेवक सुधीर शिंदे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्याबाबत तक्रार केली आहे. 

नगराध्यक्षांच्या विरोधातील मोहिमेला आणखी बळ मिळावे, या साठी महाविकास आघाडीने आमदार शेखर निकम यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यानुसार पाग येथील कन्या शाळेत आमदार निकम आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची बैठक झाली. 

या बैठकीत शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाळ, राष्ट्रवादीचे गटनेते बिलाल पालकर आणि कॉंग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे यांनी भाजप आणि नगराध्यक्षांच्या विरोधातील तक्रारीची परिपूर्ण माहिती दिली. नगराध्यक्षांच्या विरोधात महाविकास आघाडीने जी मोहीम सुरू केली आहे त्या मोहिमेला आमदार निकम यांनी सहकार्य करावे, अशी मागणी सुधीर शिंदे व इतर नगरसेवकांनी केली. 

आमदार शेखर निकम यांनीही "मी तुमचाच आहे, मला ज्या ठिकाणी बोलवाल, तिथे मी तुमच्यासोबत असेन,' असा शब्द दिला. आमदार निकम हेही आता महाविकास आघाडीच्या बरोबर असल्याने महाविकास आघाडीच्या भाजपविरोधातील लढ्याला आणखी बळ मिळाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख