minister satej patil criticizes bjp on milk agitation | Sarkarnama

चंद्रकांतदादा आता पुण्याचे झाले आहेत, ते सुट्टीला कोल्हापुरात आले होते!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

त्यांच्या सुट्टीच्या आणि आंदोलनाच्या तारखा एक आल्याने त्यांनी कोल्हापुरातून आंदोलन केले होते.

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे आंदोलन म्हणजे केवळ 'स्टंट' आहे. राज्यातील दूध उत्पादकांसाठी केंद्र सरकारने काय केले हे आधी भाजपच्या नेत्यांनी सांगावे. हिंमत असेल तर भाजप नेत्यांशी संबंधीत असणाऱ्या संघात आधी दोन रुपये अधिक दर देऊन दाखवा, असे आव्हान सतेज पाटील यांनी दिले. या विधानातून त्यांनी गोकूळ संचालकांना नाव न घेता टोला लगावला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सतेज पाटील म्हणाले, "दादा आता पुण्याचे झाले आहेत. म्हणून त्यांनी दूधाचे आंदोलन पुण्यात केले. गेल्यावेळी ते सुट्टीला म्हणून कोल्हापुरात आले होते. त्यांच्या सुट्टीच्या आणि आंदोलनाच्या तारखा एक आल्याने त्यांनी कोल्हापुरातून आंदोलन केले होते.'

भारतीय जनता पक्षाने आज राज्यात दूध दर वाढीसाठी राज्यव्यापी आंदोलन केले. याबाबत प्रसार माध्यमांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना विचारले असता त्यांनी भाजपचा स्टंट असल्याचे सांगून आंदोलनाची खिल्ली उडवली. यावर मंत्री पाटील म्हणाले,"स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी भाजपने केलेला हा "स्टंट' आहे. आधी दूधाचे टॅंकर मार्गस्थ झाले मग त्यांनी आंदोलन केले. मुळात केंद्र सरकारने राज्यातील दूध उत्पादकांसाठी काय केले याचे उत्तर भाजप नेत्यांनी द्यावे. केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करून व्यापाऱ्यांचे हित साधले. स्थानिक पातळीवर बोलायचे झाल्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधीत असणाऱ्या संघाचा दर किती ? भाजपचे पदाधिकारी त्या संघात संचालक आहेत. या संघात 26 रुपये दराने दूध घेतात आणि 58 रुपयांनी विकतात. सर्व खर्च वजा करूनही 24 रुपये शिल्लक राहतात ते जातात कुठे? त्यांच्या हिंम्मत असेल तर आधी तुमच्या संघात 2 रुपये जास्त दर देऊन दाखवा.'

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या! 

सांगली : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आग्रहाने केल्याची केल्याचे सांगितले. आज वाटेगाव येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख