सतेज पाटील, मुश्रीफांच्या पराभवासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते  - Many wanted Satej Patil and me to be defeated : Hasan Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

सतेज पाटील, मुश्रीफांच्या पराभवासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते 

सुनील पाटील 
शुक्रवार, 7 मे 2021

त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) (Gokul) संघामध्ये नियती आमच्यासोबत होती. भारतीय जनता पक्षाने सत्तारूढ संचालकांना एकतर्फी पाठिंबा दिला होता. पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि माझा सपाटून पराभव व्हावा, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. मात्र, यावेळी त्यांचा भ्रमनिरास झाला, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज लगावला. (Many wanted Satej Patil and me to be defeated : Hasan Mushrif)

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आज गोकुळच्या नवोदित संचालकांचा सत्कार पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयवंतराव आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

हेही वाचा : आता स्टॅलिन देणार गांधी अन् नेहरूंना आदेश; तमिळनाडूत नवे सरकार

मुश्रीफ म्हणाले, ‘‘निवडणुकीवेळी दिलेल्या आश्‍वासनानुसार गोकुळचा कारभार केला जाईल. यासाठी एक-दोन महिने अभ्यास करावा लागेल. दूध उत्पादकांना प्रतिलिटर दुधाला 2 रुपये जास्त देण्यासाठी नियोजन केले जाईल.’’ 

दरम्यान, गोकुळमध्ये आपली सत्ता येऊ नये. सतेज पाटील आणि माझा पराभव व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्षासह अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. सर्व सभासदांनी आमच्यावर विश्‍वास टाकला आहे. तीस वर्षांची सत्ता उलथवून आमच्याकडे दिली आहे. आम्ही या निवडणूकीत सकारात्मक प्रचार केला. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केले जाईल. ही बाब दूध उत्पादकांना पटली आहे. 

या वेळी पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदिप नरके, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर उपस्थित होत्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख