सामंतांच्या पहिल्याच मेळाव्यास मंडलीक, क्षीरसागर, सरुडकरांची दांडी  - Mandlik, Kshirsagar, Sarudkar absent at the first meeting of the liaison chief Samant | Politics Marathi News - Sarkarnama

सामंतांच्या पहिल्याच मेळाव्यास मंडलीक, क्षीरसागर, सरुडकरांची दांडी 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर येणार असे सांगण्यात आले. मात्र ते शेवटपर्यंत सभागृहात दिसले नाहीत. 

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत कोल्हापूरचे संपर्क प्रमुख झाल्यानंतर शिवसैनिकांचा हा पहिलाच पदाधिकारी मेळावा होता. मात्र, खासदार संजय मंडलीक, माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि सत्यजीत पाटील-सरुडकर अनुपस्थित होते. त्याची चर्चा आज (ता. 1 नोव्हेंबर) दिवसभर कोल्हापुरात होती. 

खासदार मंडलिक हे पुण्यात असल्यामुळे, तर राजेश क्षीरसागर हे मुंबईत असल्याने या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगण्यात आले. माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर येणार असे सांगण्यात आले. मात्र ते शेवटपर्यंत सभागृहात दिसले नाहीत. 

बेळगावच्या मराठी माणसाचा मुद्दा असो किंवा स्थानिक नागरी प्रश्‍न असो, जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी नेहमीच आवाज उठवला. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढली. गेल्या वेळी आपले सहा आमदार होते. जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार अधिक करायचा असेल, तर सर्व पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची वज्रमूठ बनवली पाहिजे. यासाठी आपसातील गटबाजी विसरून सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

कोल्हापुरात बरेच जण बरेच काही ठरवतात. आता आमचंही ठरलंय जिल्ह्यात केवळ एकच गट तो म्हणजे "उद्धव गट', असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना सांगितले. 

शासकीय विश्रामगृहात झालेल्या शाहू सभागृहातील पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. मंत्री सामंत यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. 

या वेळी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. खासदार धैर्यशिल माने यांनी मनोगतामध्ये सामान्य शिवसैनिकाला बळ देण्यासाठी त्यांची कामे होणे आवश्‍यक असून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. 

या वेळी मंत्री सामंत म्हणाले, "शिवसेनेसारखे मजबूत संघटन जगात कोणत्याही संघटनेकडे नाही. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. आता शिवसेनेचा विस्तार आणखी वाढवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वज्रमूठ बनवण्याची आवश्‍यकता आहे. ही वज्रमूठ अभेद्य असली पाहिजे. यासाठी गटबाजी थांबली पाहिजे.

गटबाजी करणाऱ्यांना कोणताही थारा नाही. जिल्ह्यात शिवसैनिकांचा एकच गट असेल तो म्हणजे "उद्धव गट'. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे. 

जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तारही होईल. महामंडळे, समित्या यामध्ये शिवसेनेचा वाटा शिवसेनेला मिळाला पाहिजे. यासाठी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्याशी बोलणार आहे. सत्ता आणि संघटना या माध्यमातून शिवसेनेचा विस्तार झाला पाहिजे, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. 

या मेळाव्याला जिल्हा प्रमुख विजय देवणे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, शिवाजीराव जाधव, हर्षल सुर्वे, मनजीत माने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख