‘गोकुळ’मधील महाडिक कंपनीच्या भ्रष्ट सत्तेवर निर्णायक घाव घाला : सतेज पाटील

मल्टिस्टेटच्या माध्यमातून गोकुळ प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण सर्वांनी हाणून पाडला.
Make a decisive blow to the corrupt power of Mahadik Company in Gokul: Guardian Minister Satej Patil
Make a decisive blow to the corrupt power of Mahadik Company in Gokul: Guardian Minister Satej Patil

कुरुंदवाड : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघामधील (गोकुळ) महाडिक व कंपनीची भ्रष्ट सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. फक्त एकवेळ सत्ता द्या, दूध उत्पादकांना लिटरला दोन रुपये जादा दर देऊन दाखवू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे झालेल्या जाहीर सभेत दिले. 

गोकुळच्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचार प्रारंभ येथील जैन सांस्कृतिक भवनात झाला. त्या वेळी ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यायसह आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘गोकुळवर पंचवीस तीस वर्षे महाडिकांची सत्ता आहे. मल्टिस्टेटच्या माध्यमातून गोकुळ प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण सर्वांनी हाणून पाडला. आता त्यांच्या एकहाती सत्तेवर निर्णायक घाव घालण्याची संधी आली असून 2 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन करा. मल्टिस्टेट, वासाचे दूध, पशुखाद्य असे अनेक विषय आहेत. गोकुळ सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेणघाण व धारा काढणाऱ्यांचा संघ असून त्याच्यावर मालकी दूध उत्पादकांची राहण्यासाठी आमचा लढा आहे.’’

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, ‘‘शिरोळ तालुक्‍यात 134 ठराव असतानाही उमेदवारी मिळाली नसली तरी तालुक्‍यातील दूध संस्था ठरावधारक उत्पादकांच्या हितासाठी राजर्षी शाहू आघाडीच्या पाठीशी आहेत. भविष्यात शिरोळला प्रतिनिधित्व द्यावे व सभासदत्व करून घ्यावे.’’

माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, ‘‘गोकुळ चांगला चालावा, जागतिक स्पर्धेत टिकावा व ‘अमूल’शी टक्कर देण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी जिल्ह्यातील नेते एकत्र आले तेव्हाच निर्णय झाला आहे.’’

ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी केले. नगराध्यक्ष जयराम पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, अरुण डोंगळे, दिलीप पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सर्जेराव शिंदे, विजय पाटील, भवानीसिंग घोरपडे, तानाजी आलासे, जवाहर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. सुजित मिणचेकर यांनी आभार मानले.

जरा कष्ट घ्या विजय आपलाच 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘प्रचाराच्या प्रारंभाला शिरोळ तालुक्‍यातील 134 पैकी 81 ठरावधारक उपस्थित आहेत. 8 ठरावधारकांनी लस घेतली आहे, त्यामुळे शंभरी पार करायला अवघड नाही. जरा कष्ट घ्या विजय आपलाच आहे.’’


मतपत्रिकेत पै पाहुणे नातेवाइकांना हुडकू नका

आम्ही शपथ घेतली आहे पॅनेल टू पॅनेलची. त्यामुळे ठरावधारकांनी फक्त कपबशी चिन्ह बघायचे व शिक्का मारायचा. इकडे तिकडे बघू नका, घोटाळा होईल. मतपत्रिकेत पै पाहुणे नातेवाइकांना हुडकू नका. कपबशीचा एकच ध्यास घ्या व शिक्का मारा, असे आवाहनही त्यांनी केले.


दूध उत्पादकांच्या हाती सत्ता येण्यासाठी लढा

पेठवडगाव : ही लढाई सत्तेसाठी नाही. दूध उत्पादकांना जादा दर देण्यासाठीची आहे. पंचवीस वर्षे एक हातातील सत्ता उत्पादकांच्या हातात देण्यासाठीची लढाई आहे. पाच वर्षे आमच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या वतीने गोकुळच्या निवडणुकीची येथे प्रचार सभा झाली. या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार राजू आवळे, राजेश पाटील, ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष बजरंग पाटील,माजी खासदार निवेदिता माने,जिल्हा परिषदचे अर्थ सभापती प्रवीण यादव उपस्थित होते. आमदार राजू आवळे, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, भगवान जाधव यांची भाषणे झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com