Maharashtra minister hasan mushriff on prithviraj chavans advice | Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला अंमलात आणण्याची वेळ आली आहे : मुश्रीफ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

केंद्र सरकारचे  अर्थसचिव अजयभूषण पांडे यांनी देशातील राज्यांचा जीएसटी परतावा देण्यासाठी केंद्राकडे पैसेच नसल्याचे संसदीय समितीसमोर सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे, यावरून देशाची अर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील बफर स्टॉकची योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे साखर कारखान्यांच्या अडचणी वाढणारच आहेत. व्याजाचा परतावाही मिळणार नाही, असे मत मत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

साखर कारखानदारांना पक्षामध्ये प्रवेश देतानाच त्यांना आर्थिक बूस्टर देण्याचे वचन श्री. फडणवीस यांनी दिले होते. परंतु,
महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे राज्यातून आर्थिक मदतीचे वचन पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळासह दिल्लीला गेले. पुढील वर्षी ऊस पिकाचे बंपर उत्पादन असून कारखाने सुरू झाले नाही तर शेतकऱ्यांचा ऊस गाळला जाणार नाही. त्यासाठी बफर स्टॉक योजना ऑगस्टपासून नवीन सुरू ठेवणे, त्यावरील व्याज केंद्र सरकारने तात्काळ द्यावे, आदी मागण्या मान्यच झाल्या, अशा भीमदेवी थाटात श्री. फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

एका मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी या शिष्टमंडळाबाबत विधाने केली होती. त्याची खिल्ली उडवली होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे किती अज्ञान आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता, असे या पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे. दोन दिवसापूर्वी केंद्राकडून 19000 कोटींचा जीएसटी परतावा महाराष्ट्राला दिला. त्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठ थोपटून केंद्राचे आभार मानण्यास सांगितले होते. कंपोझिटमधून पैसे केंद्राने देऊन जणू उपकारच केल्याचा अविर्भाव आणला होता. मी वित्त विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर 19000 हजार कोटी रुपये हा मार्च 2020 या महिन्यापर्यंतचा परतावा असून एप्रिल, मे, जून व जुलै या महिन्यांचा परतावा अद्याप दिलेला नाही, असेही या पत्रकात म्हटले आहे.

कर्ज घ्या किंवा नोटा छापा

केंद्राकडून मदत मिळाली नाही तरी मुख्यमंत्री श्री. ठाकरे त्याबद्दल कधीच टीका करीत नाहीत किंवा खंतही व्यक्त करीत नाहीत. केंद्र वराज्य यांनी समन्वयाने काम केले पाहिजे, अशी त्यांची भूमिका असते. मला वाटते राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जो सल्ला दिला होता, ते करण्याची वेळ आता आली आहे. मी अर्थतज्ञ नाही. परंतु कोरोना संकटामुळे उद्भवलेली आर्थिक मंदी जावयाची असेल तर लोकांपर्यंत पैसा गेला पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने रिझर्व बॅंकेकडून कर्ज घ्यावे किंवा नोटा छापाव्या व या गर्तेतून राज्यांना बाहेर काढावे, असा सल्लाही श्री. मुश्रीफ यांनी दिला आहे.

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख