महादेवराव महाडीक यांनी घेतली भाजपचे समरजितसिंह घाटगे यांची भेट  - Mahadevrao Mahadik met BJP's Samarjit Singh Ghatge | Politics Marathi News - Sarkarnama

महादेवराव महाडीक यांनी घेतली भाजपचे समरजितसिंह घाटगे यांची भेट 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

या निवडणुकीत जागा वाटपाबाबत सत्तारूढ गटाशी चर्चा करण्याचे सर्वाधिकार समरजितसिंह घाटगे यांना दिले आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी शुक्रवारी (ता. १६ एप्रिल) शाहू-कागल आघाडीचे प्रमुख व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची त्यांच्या नागाळा पार्क येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन या भेटीत महाडीक यांनी घाटगे यांना केले आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजपने सत्तारूढ गटाला पाठिंबा दिल्याची घोषणा यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या निवडणुकीत जागा वाटपाबाबत सत्तारूढ गटाशी चर्चा करण्याचे सर्वाधिकार समरजितसिंह घाटगे यांना दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या गटाचा अलिकडेच कागलमध्ये मेळावा झाला होता, त्यात या गटाला एक-दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपकडे सुमारे 250 ठरावधारक असल्याचा दावा करण्यात येत आहे. या जोरावर एक तरी जागा भाजपाला मिळावी, यासाठी घाटगे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील सर्वाधिक घाटगे यांना दिल्याने महाडीक यांनी त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

दरम्यान, माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या स्नूषा व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडीक याही या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सौ. महाडीक ह्या श्री. घाटगे यांच्या नात्याने चुलत बहिण लागतात. या निवडणुकीच्या निमित्ताने पै-पाहुण्यांची साथ मिळावी, हाही या भेटीमागचा उद्देश आहे.

हेही वाचा : आमदार वैभव नाईकांनी जलजीवनच्या आराखड्याचे श्रेय लाटू नये

सिंधुदुर्गनगरी : जलजीवन मिशनच्या आराखड्याला मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला आहे आणि त्यांनी त्याला मंजुरीही दिली आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या प्रयत्नातून आराखडा तयार झाला आणि त्याला मंजुरी लवकरच घेणार, अशी पत्रकबाजी करून फुकटचे श्रेय लाटू नये. मेहनत घेऊन आराखडे तयार करणाऱ्या ग्रामसमित्यांचा अवमान करू नये, असा सल्ला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व गटनेते रणजित देसाई यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी करण्यासाठी 207 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये जिल्ह्यातील 2241 वाड्यांचा समावेश आहे. हा आराखडा आपल्या प्रयत्नातूनच झाला असे भासविण्यासाठी आणि जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी आमदार नाईक पत्रकबाजी करत आहेत. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत व गटनेते देसाई यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी जिल्हा परिषद सभापती अंकुश जाधव, शर्वरी गावकर, महेंद्र चव्हाण, संतोष साटविलकर, रेश्‍मा सावंत आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख