"गोकूळ'चे नेतृत्व करा; पण भोगावती कारखान्याकडे दुर्लक्ष करू नका 

इंजिनिअरिंग विभागाचा पगार अडीच कोटीही डिस्टिलरीकडे जमा दाखवले आहे. डिस्टिलरी अनेक वर्षांपासून चालवायला दिली असताना हा व्यवहार दाखवलाच कसा हे समजत नाही.
Lead the Gokul; but don't ignore the Bhogavati sugar factory
Lead the Gokul; but don't ignore the Bhogavati sugar factory

राशिवडे बुद्रुक (जि. कोल्हापूर) : "भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी "गोकुळ' सारख्या मोठ्या संस्थेचे नेतृत्व जरूर करावे, त्याला आमचे दुमत नाही. पण, पस्तीस हजार सभासदांचा संसार ज्यावर सुरू आहे. त्या कारखान्याचे हितही पाहावे, दुर्लक्ष करून चालणार नाही. लेखापरीक्षण अहवालातील कोट्यवधींची आकडेवारी संभ्रम वाढवणारी आहे, याबाबत गांभीर्याने घ्यावे,'' असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. 

कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर लेखापरीक्षकांनी ओढलेले ताशेरे आणि चुकीच्या कारभारावर आज पुन्हा बोट ठेवले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले, "" सभेच्या अहवालात ऊस विकास निधी म्हणून सत्तावन्न कोटीवर खर्च कसा झाला, हे समजत नाही. पहिल्यांदाच ऊस विकास निधी व इतका मोठा खर्च झाला आहे, असे दिसून येते. लेखा परीक्षकांच्या अहवालात कर्जावरील व्याज 34 कोटी दिसते. यापैकी 14 कोटी दिलेले दाखवले, तर 20 कोटी रुपये क्रमांक दोनच्या खात्यावरून डिस्टिलरीकडे दाखवले आहेत. शिवाय इंजिनिअरिंग विभागाचा पगार अडीच कोटीही डिस्टिलरीकडे जमा दाखवले आहे. डिस्टिलरी अनेक वर्षांपासून चालवायला दिली असताना हा व्यवहार दाखवलाच कसा हे समजत नाही.'' 

पीपी बॅग खरेदीमध्ये कुणी ढपला मारला, स्क्रॅप किरकोळ विक्री करून विकला; ऑर्डरपेक्षा जादा माल कुणाच्या मर्जीने घेतला, टेंडर फोडून पेन्शीलने फेरफार करणे हा काय प्रकार, आहे. हे लेखापरीक्षकांनी पुढे आणलेले मुद्दे आहेत. यंदा कधी नव्हे ते गोडाऊनच्या बाहेर साखर मारली आहे. कारखान्याच्या मुख्य आवारात साखरेचा डेपो मारला असता तर चांगले झाले असते, उघड्यावर साखर ठेवली आहे. हमाल बंद करून बगलबच्च्यांना ठेका दिला, यावर लाखोंच्या घरात खर्च झाला आहे, असा आरोपही पाटील यांनी केला. 

या वेळी शेतकरी संघटनेचे रावसाहेब डोंगळे, अण्णाप्पा चौगुले, सातापा पाटील उपस्थित होते. 

केव्हाही या तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील : उदयसिंह पाटील 

स्वाभिमानीच्या आरोपांबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील म्हणाले, "केवळ आकडेवारी न देता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सभेनंतर कारखाना कार्यालयात यावे, आम्ही सर्व हिशेब त्यांच्यासमोर ठेवतो. स्पष्ट आणि चोख व्यवहार सुरू आहे. याची प्रचिती त्यांना येईल. सभासदांपुढे आकडेवारी ठेवली म्हणजे सगळेच पटते, असेही नाही. कोरोना काळात साखर विक्रीवर मर्यादा आल्यामुळे गोडाऊन ठप्प झाली. परिणामी आज साखरेची उघड्यावर थप्पी मारावी लागते. हा प्रश्न सर्वच कारखान्यांसमोर आहे. आम्ही त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास बांधील आहोत. केव्हाही हक्काचा कारखाना म्हणून यावे उत्तरे मिळतील.'' 

या प्रसंगी कार्यकारी संचालक के. एस. चौगुले, संचालक ए. डी. चौगुले, पांडुरंग पाटील, धीरज डोंगळे, संजय पाटील उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com