kolhapur waiting for governor nominated members in legislative council
kolhapur waiting for governor nominated members in legislative council

राज्यपाल नियुक्त आमदारांत कोल्हापूरला संधी मिळणार

विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाध्यक्ष श्री. पवार यांनीच जाहीर सभेत तसा शब्द दिल्याने त्यामुळे सद्यःस्थितीत ए. वाय. यांना संधी शक्‍य आहे.

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी 21 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसह भाजपकडूनही कोल्हापूरला डावलले आहे. राष्ट्रवादीने माजी आमदार शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी यांना तर भाजपने नव्या चार चेहऱ्यांना संधी दिली. दरम्यान, जूनमध्ये रिक्त होणाऱ्या 12 जागांपैकी एक जागेवर कोल्हापूरला संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

आमदारांतून निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या नऊ जागांचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. 29 आमदारांमागे एक जागा प्रत्येक पक्षाला येणार आहे. त्यानुसार भाजपला चार तर शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन व कॉंग्रेसला एक जागा येते. कॉंग्रेसने एका वाढीव जागेची मागणी केली असली तरी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एक पाऊल पुढे मागे होण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह आघाडीला पाठिंबा दिलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नावाची चर्चा होती. यापैकी श्री. महाडिक स्वतःच इच्छुक नव्हते, तर श्री. शेट्टी यांनी कार्यकर्त्यांकरवी दबाव वाढवला होता. आज भाजपने चार नव्या चेहऱ्यांना संधी देताना दिग्गज आणि निष्ठावंतांना डावलले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक शशिकांत शिंदे यांना संधी देऊन श्री. शिंदे यांचा सन्मान केला आहे. त्यांच्यासह लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मुलुख मैदान तोफ म्हणून महाराष्ट्र गाजवलेल्या अमोल मिटकरी यांना संधी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छुक ए. वाय. यांचा भ्रमनिरास झाला आहे.

जून 2020 मध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदार निवृत्त होत आहेत. यात राष्ट्रवादीचे चार, कॉंग्रेसचे पाच तर रिपब्लिकन पार्टीच्या जोगेंद्र कवाडे यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे दोन आमदार विधानसभेला निवडून गेल्याने दोन जागा रिक्त आहेत. राष्ट्रवादीच्या रिक्त होणाऱ्या चार जागांपैकी एका जागेवर ए. वाय. यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाध्यक्ष श्री. पवार यांनीच जाहीर सभेत तसा शब्द दिल्याने त्यामुळे सद्यःस्थितीत ए. वाय. यांना संधी शक्‍य आहे. शहराध्यक्ष आर. के. पोवार हेही यासाठी इच्छुक आहेत. पोवार आणि श्री. पवार यांची जवळीक पाहता कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता आहे.

हे सदस्य होणार निवृत्त
प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वॉजा बेग, जगन्नाथ शिंदे (राष्ट्रवादी), हसनबाबू खलिफ, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील, रामहरी रूपानवार (कॉंग्रेस), जोगेंद्र कवाडे (पिपल्स रिपब्लिकन पार्टी)

आघाडीमुळे काही जागा जाणार
सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे तीन पक्षाचे सरकार आहे. सरकार जी नांवे देईल तीच राज्यपालांना मान्य करावी लागणार आहेत. सध्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे राज्यपाल नियुक्त आमदारांत वर्चस्व असले तरी शिवसेनेलाही यातील काही जागा सोडाव्या लागतील. रिक्त दोन जागांशिवाय दोन्ही कॉंग्रेसची एक जागाही शिवसेनाला द्यावी लागेल. प्रत्येकी चार जागा या तीन पक्षांच्या वाट्याला येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com