k p patil and a y patil run in governor nominated mlc post race | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

के. पी.- ए. वाय. यांची राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी फिल्डिंग; हसन मुश्रीफ पेचात!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

आतापर्यंत राज्यपाल किंवा आमदारांच्यातून निवडून द्यायच्या जागेतून कोल्हापुरला कधी संधी मिळालेली नाही. आता संधी आहे पण या दोघांतच रस्सीखेच सुरू झाल्याने दोघांच्याही समर्थकांच्या नजरा मुंबईला लागल्या आहेत.

कोल्हापूर : गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राधानगरी-भुदरगडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यासाठी सुरू झालेली स्पर्धा राज्यपाल नियुक्त विधानपरिषद निवडणुकीतही पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील आणि त्यांचे मेव्हणे (बहिणीचे पती) व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या दोघांनीही यासाठी प्रयत्न सुरू केल्याने जिल्ह्यातील नेत्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची मुदत 6 जून रोजी संपत आहे. या 12 आमदारांपैकी दोन आमदार विधानसभेत निवडून गेल्याने तेव्हापासून या दोन जागा रिक्तच आहेत. राज्यात शिवेसना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस अशा तीन पक्षांचे मिळून सरकार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या आमदारांतून निवडून द्यायच्या विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसला एक जागा कमी देण्यात आली. त्यावेळी राज्यपाल नियुक्त आमदारांत एक जागा वाढवून देण्याचा शब्द आघाडीच्या नेत्यांनी कॉंग्रेस नेतृत्त्वाला दिल्याचे समजते. तसे झाल्यास शिवसेना व राष्ट्रवादीला मिळून सात तर कॉंग्रेसच्या वाट्याला पाच जागा येतील.

विधानसभेच्या निवडणुकीत राधानगरी-भुदरगडमधून के. पी. व ए. वाय. या दोघांनीही उमेदवारीचा दावा केला होता. दोघांच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्याच नेत्याला उमेदवारी का ? याचे संदेश व्हायरल केले होते. त्यातून या मतदार संघातील उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत सुरू होता. शेवटी हा वाद पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत गेला. त्यांनी मध्यस्थी करून के. पी. यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर के. पी. यांच्या प्रचारासाठी आलेल्या श्री. पवार यांनी भर सभेत ए. वाय. यांचे कौतुक करताना त्यांनी केलेल्या त्यागाची पक्ष नोंद घेईल असे सांगत विधानपरिषदेच्या अप्रत्यक्ष शब्दही दिला होता.

विधानसभेत के. पी. यांना केलेली प्रामाणिक मदत, त्यांच्याकडे असलेला कारखाना आणि श्री. पवार यांचा 'शब्द' या जोरावर ए. वाय. यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आपली ताकद लावली आहे. पण त्याचवेळी के. पी. यांनी थेट राज्य पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधून आपल्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा आहे. त्यातून श्री. मुश्रीफ यांच्यासमोरच पेच निर्माण झाला आहे. आतापर्यंत राज्यपाल किंवा आमदारांच्यातून निवडून द्यायच्या जागेतून कोल्हापुरला कधी संधी मिळालेली नाही. आता संधी आहे पण या दोघांतच रस्सीखेच सुरू झाल्याने दोघांच्याही समर्थकांच्या नजरा मुंबईला लागल्या आहेत. यासंदर्भात काय निर्णय होणार, हे आठवडाभरात कळणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख