जयंत पाटलांच्या कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी... - Jayant Patils sugar factory weighbridge inspection done by local authority | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटलांच्या कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी करण्यात आली आहे.

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी करण्यात आली आहे. वैध मापन विभागाच्या भरारी पथकाने ही तपासणी केली केली. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी हे पथक तयार केले आहे. 

वैध मापन विभागाच्या भरारी पथकाकडून वजनकाट्यांची अचानक तपासणी केली जात आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे व वाटेगाव- सुरुल शाखेच्या ठिकाणी अचानक येवून वजन काट्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी भरारी पथकाने सर्व वजन काटे अचूक असल्याचा लेखी अहवाल कारखाना व्यवस्थापनाला दिला आहे.

नायब तहसिलदार सुनील ढाले, सांगली लेखापरिक्षक (साखर) राजेंद्र कुडचे, निरीक्षक वाय.एस.आगरवाल, सहाय्यक पोलीस फौजदार गणेश भरते, कॉन्स्टेबल जे.एन. मुलाणी, पोलीस नाईक एम. एन. घस्ते यांचा भरारी पथकामध्ये समावेश आहे. या पथकाने कारखान्याच्या साखराळे युनिटला मंगळवारी दुपारी अचानक भेट सर्व काट्यांची तपासणी केली. 

सर्व काटे अचूक असल्याचा अहवाल कारखाना व्यवस्थापनास देण्यात आला आहे. यावेळी चीफ इंजिनिअर विजय मोरे, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर रमेश बोराळकर व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. पथकाने कारखान्याच्या वाटेगाव-सुरुल शाखेस मंगळवारी सकाळी भेट दिली. तेथील सर्व काट्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी चीफ इंजिनिअर संताजी चव्हाण, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर वैभव पाटील, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख