नुसतेच गोलगोल फिरवू नका : जयंत पाटलांनी घेतली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची फिरकी  - Jayant Patil took the spin of NCP office bearers | Politics Marathi News - Sarkarnama

नुसतेच गोलगोल फिरवू नका : जयंत पाटलांनी घेतली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची फिरकी 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

प्रत्यक्ष बैठकीच्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत, याची हात वर करून माहिती घेतली.

चिपळूण : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षाचा आढावा घेतला. उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्‍यांचा आढावा घेताना त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांची फिरकी घेतली. 

संगमेश्‍वर तालुक्‍याचा आढावा सुरू असताना मध्येच चिपळूणचा विषय जयंत पाटलांनी काढला. त्यांनी तालुकाध्यक्षांना उभे करून तालुका कार्यकारिणीची संख्या विचारली. त्यानंतर प्रत्यक्ष बैठकीच्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत, याची हात वर करून माहिती घेतली. नेमके तेथे सात ते आठच सदस्य उपस्थित होते. ही जाहीर सभा नाही. कार्यकारिणी सदस्यांची बैठक आहे, नुसतेच गोलगोल फिरवू नका, असे सांगून तालुकाध्यक्षांना पाटील यांनी निरुत्तर केले. 

मंत्री पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बूथ कमिट्यांचे महत्व पटवून दिले. तालुका व शहरातील कार्यकारिणी, त्यांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. 

तालुक्‍यातील सावर्डा येथे उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, संगमेश्‍वर, आणि मंडणगड तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक, महिला व आणि सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक तालुक्‍याचा स्वतंत्र आढावा घेतला. 

प्रत्येक तालुक्‍यात आणि शहरातील कार्यकारिणी, त्यातील सदस्य संख्या, शहरातील व तालुक्‍यातील एकूण बूथ, गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला एकूण पडलेली मते, पक्षवाढीसाठी राबवलेले विविध उपक्रम, शहरासह तालुक्‍यात केलेल्या बूथ कमिट्या आदींची माहिती घेतली. 

महिला, युवक आणि बेसिकच्या सर्व शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांकडून प्रदेशाध्यक्षांनी आढावा घेतला. ही बैठक खास कार्यकारिणीतील सदस्यांसाठी आयोजित केली होती. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातून नेमके किती पदाधिकारी आलेत, याची अचूक माहिती प्रदेशाध्यक्षांनी घेतली. नवखे पदाधिकारी, महिला माहिती देताना चुळबुळत होते. 

या वेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार रमेश कदम, संजयराव कदम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या कामकाजाची शिस्त आणि कामकाजाचे धडे दिले. बूथ कमिट्या स्ट्रॉंग असतील, तरच पक्षाला बळकटी येईल. प्रत्यक्ष फिल्डवर विविध स्तरातील घटकांचा समावेश असलेली बूथ कमिटी मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख