जयंत पाटलांनी वाळव्याच्या दुखण्याचा राग सांगलीवर काढू नये - Jayant Patil should not pursue a policy of repression against traders-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

जयंत पाटलांनी वाळव्याच्या दुखण्याचा राग सांगलीवर काढू नये

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जुलै 2021

इथली बाजारपेठ मोडण्याचा छुपा डाव कुणी आखला असेल तर त्याला सांगलीकर थारा देणार नाहीत.

सांगली : सांगली आणि मिरजेची बाजारपेठ शुक्रवारी (ता. २३) सकाळी उघडली जाईल. व्यापाऱ्यांसोबत फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, रिक्षा चालक, फुलवाले सारेच नियमांचे काटेकोर पालन करून ‘पुनश्‍च हरिओम’ करतील. पालकमंत्री जयंत पाटील कोरोना नियंत्रणात सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांनी हे मान्य करून कोरोना प्रतिबंधाच्या अन्य उपाययोजनांवर लक्ष द्यावे, त्यात आम्हीही साथ देऊ. परंतू, व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलिस, प्रशासनाकडून दडपशाहीचा प्रयत्न झाला तर सार्वत्रिक असहकाराला जामोरे जावे लागेल, असे आव्हान भाजपचे नेते व सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी आज (ता. २१ जुलै) दिले. (Jayant Patil should not pursue a policy of repression against traders : Prithviraj Pawar)

पृथ्वीराज पवार म्हणाले की, ‘‘गेली दीड वर्षे व्यापाऱ्यांनी संयम दाखवला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले आहे. आता परिस्थिती गळ्याला आली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत बंद पाळूनही कोरोना कमी झाला नाही, याचा अर्थ केवळ बंदमुळे कोरोना थांबणार नाही. त्यासाठी पर्याय शोधावे लागतील आणि पालकमंत्र्यांनी त्यावर मंथन करावे. वाळव्याचे दुखणे घेऊन सांगलीवर राग काढू नये. इथली बाजारपेठ मोडण्याचा छुपा डाव कुणी आखला असेल तर त्याला सांगलीकर थारा देणार नाहीत.’’ 

हेही वाचा : हा गोपीचंद पडळकर कुणाला भिणाऱ्याची औलाद नाही

‘‘कोल्हापूर सुरु झाले, साताऱ्यात अडचण नाही, मग सांगलीबाबतच नियमांचा सोयीस्कर अर्थ का काढला जात आहे. व्यापाऱ्यांना धमकावून, धाक दाखवून आजवर त्यांना गप्प करण्याचे राजकारण झाले. येथून पुढे ते चालणार नाही. माजी आमदार संभाजी पवार यांनी अशा प्रवृत्तींना हाणून पाडले. आजही मारुती चौक सांगलीच्या पेठांचे, इथल्या व्यापाराचे संरक्षण करायला समर्थ आहे,’’ असा इशारा पवार यांनी दिला.

ते म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांनी सांगली, मिरजेतील व्यापारी पेठांत येऊन परिस्थिती पहायला हवी होती. लोकांच्या वेदना समजून घ्यायला पाहिजे होत्या. आलिशान गाड्यांतून फिरणाऱ्या चार स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली; म्हणजे सांगलीचे प्रश्‍न समजले, असे होत नाही. पालकमंत्री हे पोट भरलेल्या लोकांचे नेते आहेत, ज्यांच्या चुली विझल्या आहेत, त्यांच्याबाबत ते विचार करत नाहीत.’’

‘‘राज्य सरकारमधील एक हेवीवेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना येथील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचा निर्णय ते घेऊ शकले असते. मुख्यमंत्री यांच्या शब्दाबाहेर आहेत की सांगलीतील अपयश लक्षात घेता मुख्यमंत्र्यांसमोर जावून मान्यता घ्यायला, हे घाबरत आहेत. आता त्यांनी व्यापाऱ्यांना थांबवू नये. धमक्या तर अजिबातच देऊ नयेत. आम्ही दुकाने उघडू आणि व्यापारही चालू करू. त्यानंतर दडपशाही झाली तर संपूर्ण असहकार पुकारला जाईल,’’ असा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख