राष्ट्रवादीची भाजपबरोबर युती : काँग्रेस करणार जयंत पाटलांकडे तक्रार - Jat NCP should break alliance with BJP : Congress leader Apparai Biradar's demand | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीची भाजपबरोबर युती : काँग्रेस करणार जयंत पाटलांकडे तक्रार

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या विरोधातील व्देषातून राष्ट्रवादीचे लोक महाविकास आघाडीच्या धोरणांना सुरुंग लावत आहेत.

सांगली  ः राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भक्कम महाविकास आघाडी सत्तेवर आहे. भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे. असे असताना जतमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपशी अभद्र युती केली आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या विरोधातील व्देषातून राष्ट्रवादीचे लोक महाविकास आघाडीच्या धोरणांना सुरुंग लावत आहेत, असा आरोप तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अप्पाराय बिरादार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. (Jat NCP should break alliance with BJP : Congress leader Apparai Biradar's demand)

जतमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुधारणा करावी, यासाठी पालकमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहोत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, तसेच विविध पदाधिकारी बाबासाहेब कोडग, निलेश बामणे, भुपेंद्र कांबळे, साहेबराव कोळी, बाळ निकम, महादेव कोळी, इराण्णा निरोणी आदी प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा : हायकोर्टाच्या नोटिशीनंतर माने आक्रमक; क्षीरसागरांच्या जात प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी

ते म्हणाले, ‘‘राज्यात महाविकास आघाडी सरकारचे काम प्रभावी आहे. भाजपशी सगळीकडे दोनहात करत राज्य चालवले जात आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबतचा मुद्दा ताजा आहेच. अशा स्थितीत जतची राष्ट्रवादी भाजपशी समझोता करून वागत आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे आदेश असताना काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांच्या विरोधात काम केले. तरी, ते ३५ हजार मतांनी विजयी झाले. जत नगरपालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेस उमेदवाराला नगराध्यक्ष म्हणून निवडले. त्यावेळी नेत्यांच्या पुढाकाराने उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचा आणि विषय समित्यांत समान जागा वाटप करण्यात आले. हे सारे सुरळीत चालू शकले असते, मात्र राष्ट्रवादीने आमदार सावंत यांच्या व्देषातून वेगळेच धोरण राबवले आहे.’’

‘‘जत नगरपालिकेची कामे आम्ही मंजूर करतो, कामे करतो, त्याचे उद्‍घाटन मात्र राष्ट्रवादीचे लोक भाजपच्या माजी आमदारांना सोबत नेऊन करतात. प्रोटोकॉल मोडून कामे करणे अनधिकृतच आहे. आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कामावर समाधानी आहोत. आमदार सावंत गेली दहा ते बारा वर्षे कर्नाटकातून पाण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याला यश आले. जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जतच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावला. त्यांनी आता जतमधील राष्ट्रवादीचा प्रश्‍नही मार्गी लावायला हवा. त्यांनी इथल्या नेत्यांना सक्त सूचना द्यावी,’’ अशी आग्रही मागणी बिरादार यांनी केली.

राज्यात एक आणि जतमध्ये एक बरोबर नाही 

जतची काँग्रेस स्वबळावर लढायला नेहमीच सक्षम राहिली आहे. भविष्याबाबतही आम्हाला चिंता नाही, मात्र राज्यात एक आणि जतमध्ये एक, हे बरोबर नाही. आपणाला भाजपशी लढायचे आहे. त्याऐवजी भाजपला सोबत घेऊन राष्ट्रवादीचे काम करणे योग्य नाही, असेही आप्पाराय बिरादार यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख