अर्णव गोस्वामी यांच्याऐवजी लोकहितासाठी आंदोलन करा : जयंत पाटलांचा भाजपला टोला  - Instead of Arnav Goswami, agitate for public interest: Jayant Patil criticizes BJP | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णव गोस्वामी यांच्याऐवजी लोकहितासाठी आंदोलन करा : जयंत पाटलांचा भाजपला टोला 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

गुन्हेगाराला पाठिंबा देण्यासाठी जर भारतीय जनता पक्ष राज्यव्यापी आंदोलन उभे करत असेल, तर ते दुर्दैवी आहे.

चिपळूण : ‘‘ज्याच्यामुळे दोन आत्महत्या झाल्या. दोन जीव गेले. कुटुंब उद्‌ध्वस्त झाले, अशा गुन्हेगाराला पाठिंबा देण्यासाठी जर भारतीय जनता पक्ष राज्यव्यापी आंदोलन उभे करत असेल, तर ते दुर्दैवी आहे. भाजपने कधी जनहितासाठी एखादे आंदोलन उभे केलेले आमच्या ऐकिवात नाही. आम्ही ते बघितलेले नाही. गुन्हेगाराला पाठिंबा देण्यापेक्षा लोकहितासाठी भाजपने आंदोलन उभारावे,’’ अशा शब्दांत जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

जयंत पाटील हे चिपळूण दौऱ्यावर आले आहेत. रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावरील हक्कभंग संदर्भात ते म्हणाले, ‘‘हक्कभंग हा विधिमंडळाचा अधिकार आहे. विधिमंडळाला काही स्वतंत्र अधिकार आहेत. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रश्न नाही. गोस्वामी यांच्या अटकेला न्यायालयाने स्थगिती दिली असेल तर ती एक वेगळी कायदेशीर बाब आहे.

अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली. मृत्यूपत्र लिहून ठेवले आणि त्यामध्ये अर्णव यांच्यासह अन्य दोघांची नावे आहेत. नाईक कुटुंबाने सतत न्यायाची मागणी केली. प्रथम पोलिसांनी अर्णव यांच्याकडे जाऊन त्यांचा जबाब घेतला. नंतर नाईक कुटुंबाने पुन्हा तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्या वेळी तथ्य आढळल्यानंतरच त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये राज्य सरकारचा संबंध येतोच कुठे, असा दावा जयंत पाटील यांनी केला. 

एका कुटुंबातील दोघेजण मृत्युमुखी पडले आहेत. एक कुटुंब उद्‌ध्वस्त झाले. त्याला कारणीभूत असलेल्या गुन्हेगाराला पाठिंबा देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करत असेल, तर हे दुर्दैवी आहे. त्यापेक्षा जनहितासाठी भाजपने एखादे आंदोलन हाती घ्यावे. आपण काय करतोय याचे भान भाजपला असायला हवे, असा टोला पाटील यांनी लगावला 

मराठा आरक्षणसंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ते अधिक लक्ष देऊन काम करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आम्ही सर्वच जण त्या विषयी एक टीम म्हणून काम करत आहोत. न्यायालयातदेखील मजबुतीने बाजू मांडण्याची तयारी सरकारने केली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख