मला मोदींसमोर नेले होते...पण मी शिवसेनेत गेलो

मला कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर होती.
I was taken in front of Modi ... but I did not leave Shiv Sena : Deepak Kesarkar
I was taken in front of Modi ... but I did not leave Shiv Sena : Deepak Kesarkar

सावंतवाडी : "मी जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली, तेव्हा मला अनेक पक्षातून ऑफर आल्या होत्या. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर नेले होते. मला कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर होती; मात्र मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो. त्यामुळे मी शिवसेना सोडणार नाही,' असे माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

ते म्हणाले, कोरोना विरोधातील लढाईस प्राधान्य दिले पाहिजे. सिंधुदुर्ग शंभर टक्के कोरोनामुक्त जिल्हा होण्यासाठी यापुढेही प्रयत्न केले जावेत. माझ्या आमदार निधीतील निधी त्यासाठी देण्यास तयार आहे, असे आमदार केसरकर म्हणाले. 

मी मंत्री असताना कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला होता; परंतु काही प्रमाणात तो परत गेला. त्याबद्दल माझी नाराजी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 200 ते 250 कोटी रुपये परत गेले, त्यामुळे जिल्ह्याचा विकास रखडला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपण सात ते आठ वेळा चर्चा केली आहे. चांदा ते बांदा योजनेचा निधीदेखील परत गेला. रस्त्याचा निधी परत गेला. सिंधुदुर्गनगरीमधील निधी परत गेला. मी पालकमंत्री किंवा मंत्री नसलो तरीसुद्धा गेल्या सात महिन्यांत सरकारकडे या निधीसाठी पाठपुरावा करत आहे. 

शासकीय मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गात व्हावे; म्हणूनदेखील माझा आग्रह राहिला. मुख्यमंत्र्यांचे आदेश निघताच शासकीय मेडिकल कॉलेजची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे, असे केसरकर म्हणाले. 

मी राज्याचा पाच वर्ष अर्थराज्यमंत्री होतो, त्यामुळे या विभागात मंजर केलेल्या निधीबाबत मला अभ्यास असल्याने मी हा पाठपुरावा करत आहे. मी मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज नाही तर चांदा ते बांदा योजना बंद करून निधी परत घेतला म्हणून माझी नाराजी आहे. जिल्ह्याच्या विकासाला "खो' पडला आहे. जनतेसाठी आपण हा निधी आणला होता, असा दावा त्यांनी केला. 

मी अपप्रवृत्ती विरोधात लढलो. त्यानंतर मला गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पर्रिकर यांनी पंतप्रधानांकडे नेऊन भाजप प्रवेश घेण्याचे ठरवले. मात्र, मी राष्ट्रवादीचा त्याग करून शिवसेनेत गेलो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनाचा दिलदारपणा मला भावला; म्हणूनच मी शिवसेनेत गेलो, असे केसरकर म्हणाले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुढील जबाबदारी घेऊन मी काम करणार आहे. मला मिळालेले विशेषाधिकार समितीचे प्रमुख म्हणून घटनेप्रमाणे काम करणार आहे. मंत्रिपदासाठी लटकून राहणारा मी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे. कोकणाला एक हजार कोटी रुपयांचा बॅकलॉग आहे. पर्यटनाचाही विकास झालेला नाही, असे ते म्हणाले. 

बांदा ते आरोंदा तेरेखोल खाडी गाळ काढून ती खोल करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी जलपर्यटन केले जाईल, या ठिकाणी मिळालेली वाळू मेरीटाइम बोर्डाने योग्य भावात लिलावात घालावी, यासाठी आपला प्रयत्न आहे. शिरशिंगे नैसर्गिकदृष्ट्या सौंदर्यवान आहे. दक्षिणेतील काश्‍मीरची ओळख शिर्शिंगेकडे पाहिल्यानंतर होते, तसे पर्यटनस्थळ ते बनवायचे होते. तेथील धरणाचे काम देखील जलद होईल, असे ते म्हणाले. तसेच संकेश्वर बांदा रस्ता चर्चेत आहे. मी कोल्हापूर पाडगाव शिरर्शिंगे कलंबिस्त सावंतवाडी बांदा असा रस्ता सुचवला होता. 

शहरातील काही अपप्रवृत्तीच्या घटना माझ्या कानावर आलेल्या आहेत, त्या विरोधात माझा लढा असेल. स्टॉल पुनर्वसन केले आहे, पुन्हा स्टॉल उभे राहिले तर शहराचे सौंदर्य बिघडेल आणि त्यांचे पुर्वनवसन कुठे करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मंत्रिपद मिळाले नसल्याने मी नाराज नाही. तो पक्षप्रमुखांचा निर्णय होता. मी शिवसेनेचा आहे आणि शिवसेना सोडणार नाही. उठणाऱ्या अफवांकडे मी लक्ष देत नाही, असे देखील केसरकर यांनी सांगितले. 

राणेंना त्याची जाण नाही : केसरकर 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर काहींनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र, आशा लोकांकडे दुर्लक्ष केलेले बरे. ज्यांची मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफ म्हणून काम करण्याचीही योग्यता नव्हती. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले होते. मात्र त्यांना याची जाण नाही, असा टोला केसरकर यांनी खासदार नारायण राणे यांना नाव न घेता लगावला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com