हसन मुश्रीफ म्हणतात 'हरघर गोठे - घरघर गोठे'  - Hasan Mushrif says 'Harghar Gothe - Gharghar Gothe' | Politics Marathi News - Sarkarnama

हसन मुश्रीफ म्हणतात 'हरघर गोठे - घरघर गोठे' 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

राज्यातील ग्रामीण भागामध्ये 1 लाख किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते व इतर खडीकरणाचे रस्ते निर्मिती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे

कोल्हापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) राज्यातील ग्रामीण भागामध्ये 1 लाख किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते व इतर खडीकरणाचे रस्ते निर्मिती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. "मनरेगा'मधून "हरघर गोठे-घरघर गोठे' उपक्रमही राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. 

मनरेगांतर्गत बंधनकारक असलेले कुशल-अकुशल कामावरील खर्चाचे प्रमाण यामधून राखले जाणार असून गावांमध्ये रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांसाठी मालमत्ता निर्मिती होणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

पुणे जिल्हा परिषदेने या योजनेंतर्गत "हरघर गोठे - घरघर गोठे' उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने पाणंद रस्ते निर्मिती व रस्ते खडीकरण करणे प्रस्तावित केले आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मालमत्तेचे निर्माण करण्याबरोबर रोजगार निर्मिती होणार आहे. 

"हरघर गोठे - घरघर गोठे' या उपक्रमांतर्गत गाय म्हैस यांचेकरिता गोठ्यात पक्के तळ, गव्हाण आणि मूत्रसंचय टाकी बांधणे, बचत गटांच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे बांधणे, कुक्कुटपालन शेड (निवारा) बांधणे, शेळीपालन शेड निवारा इत्यादीची निर्मिती करण्यात येत आहे.

या कामामध्ये केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे कुशल-अकुशल प्रमाण योग्य राखण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने गोठ्याच्या कामाबरोबरच बांधावर किंवा क्षेत्रावर कमीत कमी ते फळझाडांचे किंवा वृक्षलागवडीचे मनरेगाअंतर्गत अतिरिक्त काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या कामांबरोबरच मृद व जलसंधारण, गाळमुक्त धरणांची कामे, घरोघरी शोषखड्डे व घरकुल बांधणे इत्यादी कामेसुध्दा या योजनेंतर्गत घेता येतात, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. 

मनरेगांतर्गत कामांमध्ये रस्ता खडीकरण, पाणंद रस्ते तयार करणे या कामाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी या योजनेंतर्गत नियोजन विभागाच्या सर्व शासन आदेशातील अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करुन अनुज्ञेय असलेल्या कामांसाठी पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेप्रमाणे नविन्यपूर्ण उपक्रम प्रस्तावित करुन ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे, अशा सूचना जिल्हा परिषदांना देण्यात आल्या असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

सद्यस्थितीत सुरु असलेल्या कोवीड महामारीच्या पार्श्वभूमीवर ही योजना अधिक प्रभावीपणे राबवून रोजगार निर्मिती करणे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख