चंद्रकांतदादा पलंगावरून खाली पडले तर त्यांना महाआघाडी सरकार पडल्यासारखे वाटते!  

सर्व नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे.
 Chandrakant Patil, Hasan Mushrif .jpg
Chandrakant Patil, Hasan Mushrif .jpg

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पलंगावरून जरी खाली पडले तरी त्यांना महाविकास आघाडीचे सरकार पडले असे वाटत आहे. दोन वर्षे संपत आली. महाविकास आघाडीने अनेक विकासकामे केली. त्यामुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अस्वस्थ आहेत, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला. (Rural Development Minister Hasan Mushrif criticizes Chandrakant Patil) 

येथील शाहू सांस्कृतिक सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, सर्व नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी कामाला लागावे, अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्ह्यात भविष्यात मित्रपक्षांकडून कोणता तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादी दहा विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढवेल, यात तरुणांना अधिक संधी दिली जाईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

''कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढवली नाही. ही निवडणूक नेहमी वेगवेगळी लढवली आहे. प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवली आहे. महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीचा आज नारळ फुटला असे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. व्ही. बी. पाटील हे या निवडणुकीचे कारभारी असतील. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ६ आमदार विजयी झाले होते. सध्या २ आमदार विजयी झाले. मित्रपक्ष गेल्यावर्षी शून्यावर होता. भाजपही आता शून्यावर आहे.'' असेही मुश्रीफ म्हणाले.  

महाविकास आघाडीने ३४ लाख शेतकऱ्यांची २३०० कोटी रुपये कर्जमाफी केली. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्यांनाही ५० हजार रुपये देणार आहे. कोरोनामुळे ही रक्कम देऊ शकलो नाही. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे. राज्याच्या महसुलातील ५० ते ६० टक्के रक्कम कोरोनावर खर्च केली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे कौतुक केले पाहिजे. महाविकास आघाडी सरकार तीन ते साडेतीन वर्षात प्रचंड विकास करेल. महाराष्ट्र देशात एक नंबरचे राज्य बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, जिल्ह्यात पक्षबांधणी करताना मुश्रीफ यांनी परिश्रम घेतले. पक्षाचा विचार गावापर्यंत गेला पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष मुश्रीफ यांच्यामुळे मजबूत झाला. आमदार राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले. माजी आमदार राजू आवळे म्हणाले, इचलकरंजी जि. प. मतदार संघामध्ये ६ ते ७ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणू शकतो. माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले की, अलीकडे आमच्या आघाडीतील सर्व जण स्वबळावर लढायची भाषा बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी हा जिल्ह्यातील एक नंबरचा पक्ष आहे हे दाखवून देऊ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com