ज्या ज्या संस्थांना महाडिकांचा हात लागला, त्या सगळ्या संस्था बुडाल्या - Guardian Minister Satej Patil's allegations against former MLA Mahadevrao Mahadik | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

ज्या ज्या संस्थांना महाडिकांचा हात लागला, त्या सगळ्या संस्था बुडाल्या

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

त्यांच्या घशातुन दूध संघ काढून, तो सर्वसामान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठीच आमची ही लढाई आहे.

कागल : ‘‘माजी आमदार महादेवराव महाडिक यांना आम्ही सतत टँकर बद्दल विचारत होतो. काल त्यांनी आपले 40 टँकर असल्याची जाहीर कबुली दिली. ज्या ज्या संस्थांना त्यांचा स्पर्श झाला त्या सगळ्या संस्था बुडाल्या आहेत. त्यांच्या घशातुन दूध संघ काढून, तो सर्वसामान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठीच आमची ही लढाई आहे,’’ असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

कागलमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारात पाटील बोलत होते. स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात भैया माने यांनी आघाडीच्या उमेदवारांची ओळख करून दिली. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सत्ताधारी 3, 13 आणि 23 तारखेला दूध बिले देत असल्याचे सांगत आहेत. गवळीसुद्धा दहा दिवस झाले की बिल देतो. यामध्ये तुम्ही नवीन काय केलं? तुमचा कारभार जर एवढा चोख आणि दूध उत्पादकांच्या हिताचा असेल तर मग निवडणुकीची भीती तुम्हाला का वाटते?.

गोकुळची सत्ता आपण दिली, तर आम्ही वचन दिले आहे. गोकुळ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा करू. मल्टीस्टेट करण्यापासून आपण सर्वांनी संघर्ष करत खासगी होण्यापासून वाचविला आहे. हा संघर्ष वाया जाता कामा नये. आता पुढची लढाई आहे, सत्ता द्या, परिवर्तन करा. दुधाला लिटरमागे दोन रुपये दरवाढ देऊ. पारदर्शी, चोख कारभार करू. पशुखाद्य व पशु वैद्यकीय सेवा यामध्ये वाढ करू. हे सर्व जर आम्ही केले नाही तर पाच वर्षांनी आम्हाला दारामध्ये उभे करून घेऊ नका.

सत्ताधारी गोकुळ कसा चालवला हे सांगत आहेत, ते किती खोटं बोलत आहेत. आम्हाला सत्ता देऊन बघा, दूध उत्पादक महिलांना पाच वर्ष दीपावली व भाऊबीज अशी देऊ की, भाऊराया कसे असावेत, तर हसन मुश्रीफ, बंटी पाटील यांच्यासारखे असावेत, असे वाटले पाहिजे, असे मुश्रीफ म्हणाले.

गेली 25 ते 30 वर्षे सातत्याने गोकुळबाबत टिका व चर्चा असते. ती म्हणजे उधळपट्टी आणि प्रचंड खर्चाची. वासाचे दुध काढणे, दुधाची योग्य किंमत न देणे, मोठ्या लोकांच्याच टँकरना पाळी देणे, नोकऱ्यांमधील वरकमाई, मुंबई व पुण्याच्या दुध विक्री एजंटकडून वरकमाई घेतात, अशा अनेक तक्रारी आहेत. आता हे सगळ बंद करूया. शपथ घेवूया व परिवर्तन करूया, असा विश्वासही मुश्रीफ यांनी या वेळी व्यक्त केला.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, सत्ताधारी आघाडीचे नेते गोकुळ दूध संघ स्वतःच्या खाजगी मालकीचा करायला निघाले होते. परंतु, जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या जनरेट्यामुळेच तो निर्णय मागे घ्यावा लागला. गोकुळ दूध संघाचा वाहतूक ठेकेदारच सगळं मीच केलं म्हणतोय. ही प्रवृत्ती मोडूया.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, विजय देवणे, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, नविद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, शिवाजी कांबळे यांच्यासह सर्वच उमेदवार व प्रमुख मान्यवर उपस्थित होते. आभार मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मानले.

या वेळी उमेदवार विश्वास नारायण पाटील, अरुण डोंगळे यांचीही भाषणे झाली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख