पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार : सतेज पाटील  - Gramsevak, Talathi responsible if damaged farmer escapes from Panchnama: Satej Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार : सतेज पाटील 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

राज्य सरकार तत्परतेने गांभीर्यपूर्वक भरपाई देण्यासाठी पावले उचलत आहे.

कोल्हापूर : अतिवृष्टी, वादळी वारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्‍यातील शेतीक्षेत्राचे पंचनामे ग्रामसेवक आणि तलाठी यांनी करावेत. पंचनाम्यात कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी. पंचनाम्यातून शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. याबाबतचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढावेत, अशी सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 

शेतकऱ्यांनीही गट विकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पालकमंत्री पाटील यांनी चंदगड तालुक्‍यातील दुंडगे, कुदनूर, काळकुंद्री, हुदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. 

यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन कोवाड येथे बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्ह्यातील शेत पिकांचे नुकसान, सुरु असणारे पंचनामे याबाबत सविस्तर माहिती दिली. 

या वेळी पाटील म्हणाले, "जिल्ह्यामध्ये सुरु असणारे पंचनामे 30 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करा. पंचनाम्यामधून कोणताही शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता ग्रामसेवक आणि तलाठी यांनी घ्यावी. त्याबाबत त्यांची जबाबदारी राहील, तसे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढावेत. पंचनाम्यासाठी ज्या गावांत जाणार आहेत, त्याबाबत ग्रामस्थांना अदल्यादिवशी त्या त्या गावांमध्ये दवंडी देवून कळवावे. पंचनामा करण्यात येणार असल्याबाबतचा संदेशही एक दिवस आधी पाठवावा. शेतकऱ्यांनी पंचनाम्याबाबत तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना संपर्क करुन सहकार्य करावे. राज्य सरकार तत्परतेने गांभीर्यपूर्वक भरपाई देण्यासाठी पावले उचलत असून लवकरात लवकर मदत दिली जाईल.' 

हेही वाचा : सरकारवर टिका करण्यापेक्षा विरोधकांनी केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी जोर लावावा.. 

जालना : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील ज्या भागात पावसामुळे नुकसान झाले त्या भागातील महसुल वसुली थांबवण्याचे आदेश लवकरच दिले जाणार आहेत. पण शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. विरोधकांनी सरकारवर टिका करण्यात आपली शक्ती वाया न घालवता तिचा वापर केंद्राकडून राज्याला मदत कशी मिळेल, यासाठी करावा, असा टोला महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला. 

जालना तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुंभेफळ,अंतरवाला गावांना भेट देऊन सत्तार यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत पंचनामे पुर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले. वेळ पडली तर कर्ज काढू पण शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय सरकार थांबणार नाही, असे आश्वासनही सत्तार यांनी यावेळी दिले. 
 
Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख