सतेज पाटील, मुश्रीफांकडून गोकुळ दूध उत्पादकांना दीड महिन्यातच गिफ्ट! - Gokul Dudh Sangh has increased the purchase price of milk | Politics Marathi News - Sarkarnama

सतेज पाटील, मुश्रीफांकडून गोकुळ दूध उत्पादकांना दीड महिन्यातच गिफ्ट!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

दूध उत्‍पादकांना दिलेल्या आश्‍‍वासनाची पूर्तता करताना आनंद होत आहे.

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची अवघ्या दीड महिन्यात पूर्तता करत दूध खरेदी दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. म्‍हैशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये, तर गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती खुद्द गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. (Gokul Dudh Sangh has increased the purchase price of milk)

दूध उत्‍पादकांना दिलेल्या आश्‍‍वासनाची पूर्तता करताना आनंद होत असल्याचे सांगतानाच कोल्‍हापूर, सांगली व कोकण वगळून अन्य ठिकाणी दूध विक्रीत प्रतिलिटर दोन रुपये वाढ करत असल्याचेही त्यांनी स्‍पष्‍ट केले. ही दरवाढ ११ जुलैपासून लागू होईल. या पुढील काळातही गोकुळचे दूध संकलन वाढावे, यासाठी जिल्‍हा बँकेकडून म्‍हैस खरेदीसाठी ५०० कोटींचे कर्ज देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या वेळी केली.

कोल्हापूरमधील संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी गोकुळचे अध्यक्ष विश्‍‍वास पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ज्येष्‍ठ संचालक अरुण डोंगळे, तसेच सर्व संचालक उपस्‍थित होते.

हेही वाचा : इंदापूर माझी जन्मभूमी, त्यामुळे तेथे गेल्यावर मी तसंच बोलणार 

पाटील म्‍हणाले, ‘‘निवडणुकीत आम्‍ही सतत दूध दरवाढ, वासाचे दूध व पशुखाद्य यावर बोलत होतो. सत्तेत येऊन दीड महिने झाले आहेत. या काळात दूध दरवाढ कशी करता येईल, यासाठी सतत बैठका, चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गोकुळच्या प्रलंबित प्रश्‍‍नांबाबत चर्चा केली. संघाला प्रक्रियेसाठी मुंबई, पुणे येथे जागा हवी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.’’

मुश्रीफ म्‍हणाले, ‘‘संचालक मंडळ व सर्व नेते मंडळींनी एकत्र येत दूध खरेदी दरात वाढीचा चांगला निर्णय घेतला आहे. दरवाढ देताना खर्चातही बचत करण्याचे धोरण आहे. विविध प्रकारे काटकसर केली, तर त्यातून संघाचे १० ते १२ कोटी रुपये वाचणार आहेत. दरम्यान, दोन रुपये दरवाढीने संघावर ७१ कोटींचा बोजा पडेल. विक्रीदरात वाढ केल्यामुळे ६९ कोटी रुपये मिळतील. प्रत्‍यक्षात दोन कोटींचा खर्च अधिक होत असला तरी संघाच्या काटकसरीच्या धोरणाचा फायदाच होणार आहे. संघाचे संकलन २० लाख लिटर करण्यासाठी जिल्‍हा बँक व अण्‍णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज पुरवठा करणार आहे.’’

पुणे, मुंबईच्या मार्केटमध्ये म्हशीच्या दुधाला मोठी मागणी आहे. तेथे म्हशीच्या दुधाची पिशवीही शिल्‍लक राहत नाही. त्यामुळे येत्या काळात म्हैस दूध संकलनात वाढीसाठी नियोजन करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी जिल्‍ह्यात २० हजार लिटर संकलन होते. तेथे संकलन आणखी वाढवून तेही गोकुळला मिळण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत, असे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. 

प्रचारादरम्यान दोन रुपये दरवाढीचा शब्‍द दिला होता. तो अवघ्या दीड महिन्यात पूर्ण होईल, असे वाटले नव्‍हते; मात्र संघात सत्ता आल्यापासून अमलात आणलेले काटकसरीचे धोरण व अमूलने दूध विक्रीत केलेली दरवाढ आम्‍हाला उपयोगाला आली. त्यामुळेच आम्‍ही दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेऊन दिलेला शब्‍द पूर्ण करण्यात यशस्‍वी ठरलो, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख