महाडिक आणि सतेज पाटलांचे भवितव्य 18 टेबल ठरवणार ...  - The future of Mahadik and Satej Patel will be decided by 18 tables ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

महाडिक आणि सतेज पाटलांचे भवितव्य 18 टेबल ठरवणार ... 

सुनील पाटील 
सोमवार, 3 मे 2021

सात तालुक्‍यात शंभर टक्के मतदान झाले.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मंत्री, दोन खासदार आणि डझनभर आजी-माजी खासदार आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) पुन्हा सत्तारूढच बाजी मारणार की संघात सत्तांतर होणार याचा फैसला उद्या (ता. 4 मे) होणाऱ्या मतमोजणीत होणार आहे.  सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. दुपारी 12 वाजेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल. अंतिम निकाल सायंकाळी पाचपर्यंत अपेक्षित आहे. 

गोकुळच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीकडून विजयाचा दावा केल्याने या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राला लागून राहिली आहे. ‘गोकुळ'च्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. 2 मे) इर्ष्येने 99.78 टक्के मतदान झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्‍यातील 70 केंद्रावर हे मतदान झाले. यापैकी सात तालुक्‍यात शंभर टक्के मतदान झाले. एकूण 3647 मतदारांपैकी 3639 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे, सत्तारूढ आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी होतील, असा सत्तारूढ गटाला आणि या वेळी सर्वच्या सर्व जागा जिंकून विरोधी आघाडी गोकुळमध्ये सत्तांतर करेल, असा विरोधी पॅनेलने दावा केला आहे. 

कोणी कितीही शक्ती प्रदर्शन केले तरी विजय हा आमचाच असणार अशा ठाम विश्‍वास सत्तारूढचे नेते आमदार पी.एन. पाटील यांनी तर, गोकुळच्या निवडणुकीत शंभर टक्के सत्तांतर होणार, असा विश्‍वास पालकमंत्री सत्तेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही नेत्यांनी किंवा आघाड्यांना आपापल्या ठरावदारांवर ठाम विश्‍वास दाखवला आहे.

प्रत्येक ठरावदार हा आपल्यासोबतच आहे, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आजपासून प्रसार माध्यमांमध्ये कल कोणाचा असा विचारणा करणारे फोन खणखणू लागले होते. प्रत्येक कार्यकर्ता आपआपल्या नेत्यांच्या कार्यालयात काय होणार आणि कसे होणार, याची गणित मांडत बसले आहेत. 

मतमोजणीचा डेमो झाला 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान प्रक्रिय सुरक्षितरित्या राबवली आहे. आता मतमोजणीही सुरिक्षत व्हावी, यासाठी सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. तसेच, आजही त्यांनी मतमोजणी प्रक्रिया कशी राबवावी, याचा डेमो घेण्यात आला आहे, असे गोकुळचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख